झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यापूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा करत सरकार स्थापनेसाठी राज्यपाल यांना पत्र दिले आहे. आता राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड विमाने तयार आहेत. या विशेष विमानाने झामुमो आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादला जाणार आहेत. चंपई सोरेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम रांचीमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही नेते हैदराबादला जाणार नाहीत.
आमदारांनी भरलेली बस रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचली आहे. काही वेळापूर्वी आमदारांनी भरलेली बस सर्किट हाऊस सोडून विमानतळाकडे निघाली होती. १२ सीटर आणि ३३+ सीटर बस असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोन बसमधून महाआघाडीचे सर्व आमदार प्रवास करत आहेत. हैदराबाद विमानतळावरही बसेस उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार विमानतळावर पोहोचताच त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.
डी के सुरेश यांची वेगळा देश बनविण्याच्या मागणी; डी के शिवकुमार यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...
सर्किट हाऊसवरून विमानतळासाठी निघताना झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर म्हणाले की, आम्ही विमानतळावर जात आहोत. ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत हे तुम्हाला माहिती आहे, ते कधीही काहीही करू शकतात. आमच्यासोबत एकूण ४३ आमदार आहेत.
झारखंड विधानसभेची एकूण सदस्य संख्या ८१ आहे. यामध्ये बहुमताचा आकडा ४१ आहे. ज्या पक्षाला ४१ आमदारांचा पाठिंबा मिळेल तो पक्ष सरकार स्थापन करेल. चंपई हे बुधवारी ४३ आमदारांसह राजभवनात गेले होते तर त्यांना ४७ आमदारांचा पाठिंबा आहे. या ४७ आमदारांमध्ये जेएमएमचे २९, काँग्रेसचे १७, आरजेडीचे १ आणि सीपीआयच्या १ आमदाराचा समावेश आहे.
दुसरीकडे एनडीए आहे. सध्या त्यांना ३२ आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये भाजपचे २६, AJSU चे ३, NCP (AP) चे १ आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.