उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात बुधवारी रात्री मनाला चटका लावणारी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आजी आजोबा, नातवासह ४ लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. यात दोन चिमुरड्या गंभीररित्या जखमी झाल्यात. गोपीगंजनगरच्या चुडिहरी परिसरात ही दुर्घटना घडली. ज्यावेळी घरात आग लागली तेव्हा सर्वजण आरामात झोपले होते. दिवाळीच्या पहाटेच घडलेल्या दुर्घटनेमुळं संपूर्ण परिसरातील लोक शोकाकुळ झाले आहेत.
या दुर्घटनेत मोहम्मद असलम, त्यांची पत्नी शकीला सिद्धीकी, नात तश्किया, मुलगी तस्लीम, अलवीरा, रौनक हे घराच्या तिसऱ्या मजल्यावर झोपले होते. यावेळी रात्री १ च्या सुमारात घरातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात या ४ जणांचा मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात अडकलेले शकीला आणि मोहम्मद असलम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर तडफडत राहिले.
आगीत भाजलेल्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. याठिकाणाहून तश्किया, तस्लीम, अलवीराचा मुलगा शराफत यांना ट्रामा सेंटरला नेण्यात आलं. यावेळी उपचारावेळी तश्किया आणि अलवीरा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक अनिल कुमार, अधिकारी अशोक कुमार सिंह इतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांनी अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही फोन करुन बोलावलं होतं. परंतु त्या लेट आल्या.
अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला. एकाच घरातील चौघांच्या मृत्यूनंतर परिसरात शांतता पसरली. रौनक झोपेतून जागा झाला तेव्हा आगीची पर्वा न करता तो खाली पळत आला. त्याने ही दुर्घटना सगळ्यांना सांगितली. रौनक जागा नसता झाला तर आगीनं आणखी रौद्ररुप धारण करत परिसरातील इतर घरांनाही नुकसान पोहचवलं असतं. रौनकमुळे इतरांचा जीव बचावला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट कसं झालं? याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मृत लोकांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.