नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपा देशातील लोकांची मतं जाणून घेणार आणि आपला संकल्प तयार करणार आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केले. "कोर्टात राम मंदिराच्या विषयावर युक्तीवाद सुरु आहे. तरी सुद्धा अयोध्येतील 1993 मध्ये अधिग्रहण केलेली जमीन भाजपा सरकारने रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आम्ही साधू आणि संतांसोबत असून अयोध्येत भव्य राम मंदिर बांधणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये अडथळा आणू नये", असे अमित शहा यांनी सांगितले.
याचबरोबर, "पाच वर्षांसाठी सरकारचा कार्यकाळ असतो. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशाची स्थिती बदलून टाकली. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणामुळे देशातील दीर्घकालीन विकासाची पायाभरणी झाली आहे. आज जगाला भारताबद्दल आदर आहे", असेही अमित शहा म्हणाले.