नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने सोमवारी कोलकाता येथे (CCA) नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनात रॅली काढली होती. मात्र काही वेळातच पश्चिम बंगालमधील भाजप नेते आणि सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी नागरिकता संशोधन कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात चंद्रकुमार बोस म्हणाले की, भारत एक असा देश आहे जेथे सर्व धर्माच्या आणि समूदायाच्या लोकांचे स्वागत करण्यात येते. जर नागरिकता संशोधन कायदा कोणत्याही धर्माशी निगडीत नाही, तर मग यात हिंदू, शिख, बुद्ध पारसी आणि जैन यांचाच समावेश का आहे. मुस्लीमांना यात सामील का केले नाही, असा सवालही त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारत देशाची दुसऱ्या देशांशी तुलना करू नका. त्याचे कारण म्हणजे हा देश सर्व धर्म आणि समुदायासाठी खुला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलकडून या कायद्यासंदर्भात जागृती करण्यास सुरू केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
कोलकाता येथे या कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलेल्या रॅलीला भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. तर तृणमूल काँग्रेसकडून जनतेत गैरसमज निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता मात्र पक्षाचे नेतेच या कायद्याच्या विरोधात बोलले आहे.