ऑनलाइन लोकमत
पलक्कड, दि. ७ - प्राचार्य, प्राध्यापक जेव्हा निवृत्त होतात तेव्हा विद्यार्थी त्यांना आठवण म्हणून मनगटी घडयाळ, अलंकार अशा भेटवस्तू देतात. पण केरळच्या पलक्कड जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्राचार्यांसाठी निवृत्तीची भेट म्हणून प्रतिकात्मक कबर तयार केली.
डाव्या संघटनांच्या विचारसरणीशी संबंधित असलेल्या एसएफआय संघटनेने प्राचार्यांचा अपमान करण्याच्या हेतूने ही कबर तयार केली. पल्ल्कडमधील १२७ वर्ष जुन्या प्रतिष्ठीत गर्व्हमेंट व्हिक्टोरीया कॉलेजमध्ये ही घटना घडली.
प्राचार्य डॉ. टी.एन.सारासू यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एसएफआयच्या काही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३१ मार्चला सारासू निवृत्त झाल्या. ३१ मार्चच्या सकाळी सात वाजता प्रतिकात्मक कबर तयार करुन त्यावर फुले ठेवली होती. काही विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना याची माहिती दिली. मी एसएफआयच्या काही अयोग्य मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचा प्राचार्यांनी सांगितले.