जयपूर - आपल्याकडे साधारणपणे दुधाचे भाव सरकार ठरवते. त्यामुळेच अनेकदा दूध दर वाढून मिळावा, यासाठी शेतकरी आंदोलन करतात. तरीही, शेतकऱ्यांना दुधाला लिटरमागे 25 ते 30 रुपये एवढाच भाव मिळतो. तर सर्वसामान्य नागरिकांना एक लिटर दूध 40 ते 50 रुपयांना खरेदी करावे लागते. पण, राजस्थानमधील लोकांना एक लिटर दुधामागे तब्बल 3000 रुपये मिळतात. या दुधाची अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
राजस्थानमधील ऊंटांच्या दुधाला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कॅमल मिल्क आणि त्यापासून तयार होणारी पाऊडर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. त्यामुळेच अमेरिकेत ऊंटांच्या एक लिटर दुधाला 50 डॉलर मोजावे लागतात. राजस्थानमधील ऊंट मालकांसाठी ही बाब अतियश फायदेशीर ठरत आहे. येथील ऊंटमालक बीकानेर, कच्छ आणि सूरत येथील उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्या दुधाची विक्री करतात. या दुधाला 200 मिलि लिटरच्या पॅकेट्समध्ये विकण्यात येते. तर यापासून तयार केलेल्या पावडरची 200 आणि 500 ग्रॅम वजनाची पाकिटे तयार केली जातात. मात्र, ई-कॉमर्स क्षेत्रानेही या व्यवसायात प्रवेश केला आहे. एका कंपनीकडून 6000 लिटर कॅमल मिल्क प्रतिमहिना अॅमेझॉन डॉट कॉमवरुन विकण्यात येते. यावरुन कॅमल मिल्कच्या वाढत्या मागणीचा अंदाज बांधता येईल. दरम्यान, एका अभ्यासानुसार ऊंटाच्या दुधामध्ये इन्सुलिसारखे पोषक तत्वे असतात. तर या दुधामुळे संसर्गापासून बचावही होतो.