नवी दिल्ली : भारताने मदत म्हणून पाठवलेल्या गव्हामध्ये रुबेला व्हायरस असण्याची शक्यता व्यक्त करत तुर्कीने भारताचा गहू नाकारला आहे. यामुळे ५६,८७७ मेट्रिक टन गव्हाची खेप पुन्हा तुर्कीवरून गुजरातच्या कांडला बंदरावर पोहोचणार आहे.
हे जहाज २९ मे रोजी तुर्की येथे पोहोचले होते. मात्र तुर्की प्रशासनाने गव्हामध्ये रुबेला व्हायरस असण्याची तक्रार दिल्याने तो आता परत देशात आणण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये इजिप्तसह अनेक देशांना भारतीय गव्हाची पुढची खेप निर्यात होणार आहे. मात्र तुर्कीच्या निर्णयामुळे व्यापारी संकटात सापडले आहेत. तुर्की अधिकाऱ्यांच्या संपर्कात भारत सरकार असून याबाबत तपशील मागवण्यात आला असल्याची माहिती खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी दिली.
भारताने इजिप्तला ६० हजार टन गव्हाची खेप पाठवली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने केवळ तुर्कस्तानच नाही, तर संपूर्ण जग सध्या गव्हाच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे गहु महागला आहे.
...तरीही भारत मदतीला धावला
सध्या तुर्की अतिशय आर्थिक संकटात सापडला असून, देशातील महागाई ७० टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तुर्कीवर सध्या गव्हाचे मोठे आर्थिक संकट आहे. एर्दोगान सरकार परदेशातून गहू खरेदी करण्यासाठी पर्याय शोधत आहे. देशांतर्गत मागणी लक्षात घेऊन भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही १२ देशांनी भारताला मदतीची विनंती केली आहे.
तुर्कीच्या निर्णयामुळे इतर देश चिंतेत
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही गव्हाचे प्रमुख उत्पादक आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार, आफ्रिका आणि मध्य पूर्वमध्ये खाल्लेली प्रत्येक दुसरी रोटी युक्रेनच्या गव्हापासून बनविली जाते. संकटाचा सामना करणारे देश आता गव्हासाठी भारतावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तुर्कस्तानने भारतीय गव्हाबाबत केलेल्या तक्रारींमुळे अडचणीत सापडलेल्या देशांच्या अडचणी वाढणार आहेत.
रूबेला काय आहे?
भारतीय गहू नाकारल्याने दुसरे देशही भारतीय गव्हाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. इजिप्तने २ महिन्यांपूर्वी तपासणी करून भारतीय गहू आयात करण्याला मंजुरी दिली होती. रूबेला हा रूबेला विषाणूमुळे होणारा संक्रामक रोग आहे. या रोगामुळे मुलांना ताप येतो आणि रॅश होतात.
संसर्गजन्य असल्याने शिंकल्याने, खोकल्याने तो सहज पसरतो. यात दोन आठवड्यानंतर लक्षणे दिसू लागतात.तुर्की गव्हासाठी रशिया आणि युक्रेनसोबत कॉरिडॉरच्या माध्यमातून अन्य धान्य आयात करण्याबाबत चर्चा करत आहे. जर ही चर्चा अयशस्वी झाली तर तुर्कीला भारताचा गहू माघारी पाठवण्याचा निर्णय महागात पडण्याची शक्यता आहे.
लक्षणे : रॅश, ताप, सांधे दुखणे, मळमळणे, सुजलेल्या ग्रंथी
उपचार : एमएमआर लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे.