- उदय सप्रे
मंडळी, सप्रेम नमस्कार ! आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराविषयी माहिती सांगणार आहे की ज्याच्याविषयी एकाच वेळी परस्परविरोधी अनेक प्रवाद जनमानसात आढळून येतात.आणि इतकं असूनहि एक कलाकार म्हणून , एक *जिंदादिल सादरकर्ता* म्हणून , एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्याचं रसिक मनावरचं गारूड अद्यापहि कायम आहे ! जो अभिनेता , गायक , गीतकार , संगीतकार , पटकथाकार , निर्माता , दिग्दर्शक *सबकुछ* होता ! मंडळी , एवढं सगळं असणारा एकमेवाद्वितीय कलाकार होता आणि तो कोण हे एंव्हाना तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असणार की मी *किशोरकुमार* बद्धल बोलतोय ! आज किशोर कुमारची पुण्यतिथी. जाणुन घेऊ किशोर कुमार या अवलियाला...
मंडळी , मध्यप्रदेशातील खांडवा या गावी कुंजलाल गांगुली नामक एक प्रख्यात वकील आपली पत्नी गौरीदेवीसह रहात होते.त्यांना अशोककुमार , सतीदेवी व अनूपकुमार या ३ अपत्यांच्या पाठीवर ४ ऑगस्ट १९२९ रोजी एक मुलगा झाला , ज्याचं नांव त्यांनी आभासकुमार ठेवलं.पण आभासचा उच्चार *अब्बास* होऊ लागल्याचं लक्षात येताच आई गौरीदेवीने त्याचं नांव किशोरकुमार ठेवलं व याच नांवानं तो मोठा होऊ लागला.
शालेय जीवनात स्पर्धांमधे भाग घेऊन दोन्हि हातात न मावण्याएवढी बक्षिसांची रास घरी घेऊन येणारा किशोर लाजत लाजत घरी यायचा आणि घरच्यांच्या कौतुकाने आणखीनंच ओशाळून जायचा.पण बघता बघता हे बुजरेपण खट्याळपणात बदलत गेलं व किशोरच्या उनाडक्या सुरू झाल्या.इंदोरच्या ख्रिश्चन कॉलेजमधे शिकता शिकता प्रोफेसरांच्या नकला करणे , त्यांच्या खोड्या काढून जेरीस आणण्यापर्यंत मजल गेली.आणि याच्या परिणामार्थ कॉलेजमधून त्याला र्हस्टिकेट करण्यात आलं व प्राध्यापकांनी सुटकेचा श्वास सोडला.पण के.एल्.सोगल आराध्यदैवत मानणार्या किशोरच्या *प्रतिसैगल* आवाजाला मात्र कॉलेज मुकलं ! यानंतर किशोरकुमार मोठा भाऊ अशोककुमार — जो बॉम्बे टॉकीझचा हुकुमी नायक बनला होता , त्याच्या आश्रयाला मुंबईत आला.
याआधीहि किशोर एकदा मुंबईला गेला होता , जेंव्हा अशोककुमार बॉम्बे टॉकीजच्या *जन्मभूमी* चित्रपटात काम करत होते व त्यांच्या आवाजात *गई रात आई प्रभात* या गाण्याचं रेकार्डिंग चाललं होतं.संगीतकार सरस्वतीदेवी ( पहिल्या महिला संगीतकार ) यांनी अशोककुमारच्या शिफारसीवरून किशोरकुमारला या गाण्यात कोरस म्हणून संधी दिली!
वयाच्या ७ व्या वर्षी कोरसमधे गायलेला किशोरकुमार सुरुवातीला सैगलच्या शैलीतंच गायचा.१९४८ साली खेमचंद प्रकाशने किशोरला सोलो गाण्याची आणि द्वंद्वगीताचीहि प्रथम संधी दिली *जिद्दी* या चित्रपटात ! ते सोलो गाणं होतं *मरनेकी दुआएँ क्यूँ माँगू , जीने की तमन्ना कौन करे?* ( सोगलच्याच शैलीतील ) ते लताबरोबरचं द्वंद्वगीत होतं *ये कौन आया रे यह करके सोलह सिंगार* मंडळी पुढे जाऊन ज्या अभिनेत्याचा हुकुमी आवाज म्हणून किशोर गायला तो देव आनंद यात नायक होता ! देव आनंदसाठी किशोर पहिलं गाणं गायला एकल पण व सोलो पण , परंतू देव आनंदचा हा चौथा चित्रपट ! याआधी तो *हम एक है ( १९४६ )* , *आगे बढो ( १९४७ )* व *मोहन ( १९४७ )* या ३ चित्रपटात चमकला होता व रफीच्या आवाजात गायला होता!
पण १९४६ नंतर जवळजवळ ५ वर्षे किशोरकुमारला कुणीहि गायक म्हणून गंभीरपणे घ्यायला तयार नव्हता! १९४९ साली *कनीझ* चित्रपटात किशोकरकुमार पडद्यावर गाताना दिसला.यात तुरुंगातील कैद्यांचंएक गाणं होतं *हर ऐश है दुनियामें , अमीरोंकौ आराम नहिं आणि हेच किशोरचं पहिलंवहिलं यॉडलिंगचं गाणं !* पण कनीझमधे किशोर अगदीच ओझरता दिसला होता!१९५० साली *मुकद्दर* चित्रपटात किशोरकुमार पडद्यावर दुसर्यांदा गाताना दिसला , नायक सज्जन ( टी.व्हि.वरील *विक्रम और बेताल* मधील *बेताल* ) नायिका नलिनी जयवंत , संगीतकार : खेमचंद प्रकाश , भोला श्रेष्ठ व जेम्स सिंग. सगळी गाणी किशोरनेच गायली त्यामुळे सज्जनऐवजी किशोरंच भाव खाऊन गेला!
१९५० साली राज कपूर नायक असलेल्या *प्यार* चित्रपटासाठी दादा बर्मननी किशोरचा आवाज वापरला व या चित्रपटापासूनंच किशोरला दादा बर्मननी सैगलच्या ढंगातून बाहेर काढलं ! ( किशोरची पुढची गाण्याची कारकीर्द पाहिली तर दादा बर्मनने आम्हां कानसेनांवर हे केवढे उपकार करून ठेवलेत याची जाणीव होते ! ) राजच्या अवखळ भूमिकेला न्याय देणारी गाणी किशोर यात गायला : *कच्ची पक्की सडकोंपे मेरी टमटम चली जाऊ , मुहोब्बतका एक छोटासा आशियाना ,गीता दत्तबरोबर — एक हम और दूसरे तुम व ओ बेवफा ये तो बता*
किशोरकुमारला खेमचंद प्रकाशकडे सुरुवातीला सैगल शैलीत गायला असला तरी सैगल शैलीतून किशोरला बाहेर काढण्यात व यॉडलिंग स्टाईलसाठी ब्रेक देण्यात खेमचंद प्रकाशचंहि मोठ्ठं योगदान आहे ! *बाऊलामा है दिया उसको दिल , आती है याद हमको जनवरी फरवरी व एक दो तीन चार आयी बागोमें बहार* हि गाणी किशोर आशाबरोबर गायला होता.बाऊलामा व एक दो तीन चार या गाण्यांत याॅडलिंग स्टाईल अधोरेखित झाली ! खेमचंद प्रकाशचं अकाली निधन झालं नसतं तर कदाचित् किशोरसाठी विविधतेने नटलेली गाणी खेमचंदनी निर्माण केली असती आणि किशोर आघाडीचा गायक बनला असता!पण हे व्हायचं नव्हतं आणि १९६९ च्या पर्यंत चित्रपटाच्या नावाप्रमाणेच जतिन ऊर्फ राजेश खन्ना व किशोरकुमार यांना *स्टार* बनण्यासाठी *आराधना* करावी लागली नसती !
१९४६ नंतर देव आनंदसाठी किशोर परत गायला १९५१ मधे एस्.डी. ऊर्फ दादा बर्मनच्या संगीतामधे देव आनंदच्या नवकेतनने निर्माण केलेल्या व गुरुदत्तला दिग्दर्शक म्हणून प्रथम प्रकाशात आणणार्या *बाजी* मधे ! दादा बर्मनकडे देव आनंदसाठी किशोर पहिल्यांदा गायला *दिल ये क्या जीझ है...मेरे लबोंपे देखो आजभी तराने हैं* नंतर दादा बर्मनकडे आनंदसाठी किशोर हे समीकरणंच बनलं : १९५२ *जाल : दे भी चुके हम दिल नजराना दिलका* , १९५४ : *टॅक्सी ड्रायव्हर : चाहे कोई खुश हो चाहे गालियाँ हजार दे* , १९५५ : *मुनीमजी : जीवनके सफरमें राहि* , १९५५ *घर नंबर ४४ : ऊँचे सूरमें गाए जा* , १९५६ *फंटूश : देनेवाला जबभी देता पूरा छप्पर फाडके देता , दुखी मन मेरे सीन मेरा कहना , ओ जी ओ आज हमें कोई , ऐ मेरी टोपी पलटके आ* , १९५७ : *पेईंग गेस्ट : माना जनाबने पुकारा नहिं , शमा जलती है जले , हाय हाय यह निगाहें* , १९५७ : *नौ दो ग्यारह : हम है राहि प्यारके हमसे कुछ न बोलिए*
किशोरच्या विनोदी अभिनयाचं व गाण्याचं *मुकद्दर* हे १९५० सालच्या मुकद्दरपासूनंच सुरू झालं. *मुकद्दर* पाठोपाठ *शिकारी* , *शहनाई* , *कनीझ* अशा छोट्या भूमिका करत करत किशोर *सती विजय* , *आंदोलन* चा नायक बनला.पण किशोरच्या विनोदी ढंगातील नायकाच चीझ झालं ते सालच्या पी.एल्.संतौषी यांच्या *छम छमा छम* या चित्रपटातंच ! ओ.पी.नय्यरच्या संगीतातील *चल री अमीरन् झक् झक् झक्* हे किशोर ढंगातील पहिलं गाणं!
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्याच नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केलं. बिमल रॉय बरोबर *नौकरी* (१९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर *मुसाफिर* (१९५७). सलिल चौधरी जे *नौकरी* चे संगीतकार होते ते किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमारच्याऐवजी किशोरकुमारला *छोटा सा घर होगा* हे गाणं गायला दिलं.किशोरच्या मते *ज्या माणसाला साधं गुणगुणताहि येत नाहि तो माणूस जगातला सर्वांत अभागी माणूस होय ! मी स्वत:ला गायकच समजतो , अभिनेता नव्हे!*
परंतू असं असलं तरी किशोरने स्वत:ची एक विनोदाची शैली विकसित केली.विनोद , नाच आणि एनर्जी या तीनहि बाबतीतली उत्स्फूर्तता असणारा किशोरकुमारएवढा अवलिया कलाकार आजपर्यंत चित्रपटसृष्टीत झालेला नाहि! अंगविक्षेप , धागडधिंगा , ढंगदार अन् भाबड्या स्वरातील संवादफेक , अचूक टायमिंग आणि चित्रविचित्र आवाजात सतत बोलण्याची स्टाईल ! एकदा पुढील गाणी नजरेसमोर आणून बघा म्हणजे तुम्हाला पटेल की हे फक्त किशोरकुमारंच करू शकतो ! :
*दिल्ली का ढग* मधील *सी ए टी कॅट.... कहो तो क्या हुवा* *चलती का नाम गाडी* मधील *हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना?**हाफ टिकट* मधील *आँखौंमेंतुम .... मानो के ना मा नो*वानगीदाखल किशोरने गाजवलेले हे चित्रपट पहा :*नॉटी बॉय* , *शरारत* , *रंगोली* , *करोडपती* , *चलतीका नाम गाडी* , *झुमरू* , *मिस्टर एक्स इन बॉम्बे* , *बेवकूफ* , *बाप रे बाप* , *भागम् भाग* , *भाई भाई* , *मनमौजी* , *दिल्ली का ठग* , *लडकी* , *पहली झलक* , *न्यू देहली* , *नया अंदाज* , *आशा* , *बेगुनाह* , *रागिणी* , *जालसाज* , *चाचा झिंदाबाद* , *हाफ टिकट* , *हम सब उस्ताद हैं* , *अकलमंद* आणि सगळ्यात कहर म्हणजे *पडोसन*
किशोरचे किस्सेआता मी तुम्हाला काहि किस्से सांगतो की ज्यामुळे किशोरकुमारचा विक्षिप्तपणा तुमच्या लक्षात येईल.समजायला अत्यंत अवघड असं रसायन होतं किशोरकुमार म्हणजे ! ( लतानंतर संगीतातलं सर्वात जास्त ज्ञान किशोरकुमारलाच सर्वात जास्त होतं असं दादा बर्मन म्हणायचे ! अर्थात् हाही प्रेमाचा अतिरेकंच म्हणा ! )किशोरच्या मते गाणं लिहिणं अत्यंत सोपं होतं. *बसल्याजागी तुम्हि जले , पले , चले , मिले अशा शब्दराशी एकमेकाला जोडलीत की गाणं तयार !* ~ इति किशोरकुमार ! आणि हे त्याने सप्रमाण सिद्धहि केलंय. : *झुमरू* साठी मजरूह सुलतानपुरी गीत लिहित असतानाची हकीकत : किशोरला उत्स्फूर्तपणे एक शब्द आठवला *टिंबक टू* झालं.... हा शब्द वापरून गाणं करण्याचं मजरूहना फर्मान सुटलं.बरं संगीतकार स्वत: किशोरकुमारंच असल्याने हार्मोनियमवर महाराज बसले की सूर धरून ! गे ss गे ss गेली जरा टिंबक टू ...अशी ओळ किशोरने गायल्यावर मजरूह वैतागून म्हणाले , *असल्या बिनबुडाच्या शब्दावर मी काय कप्पाळ शायरी करणार?*
पण हे बेणं नटखट ! पुढची ओळ टाकली *काठमांडू काठमांडू गे ले टू , गे गे गेली जरा टिंबक टू*मजरूहना किशोरची टर उडवण्याची लहर आली व ते म्हणाले , *काठमांडूके आगे कहाँ जाएँगे?* पण हे बेणं चिवट , म्हणालं *टिंबक ला चुंबक शब्द फिट बसतो* — केली ना तिसरी ओळ तयार *मैं मैं मैं हूँ लोहा चुंबक तू*कपाळावर हात मारत मजरूहने झक मारत गाणं लिहून दिलं : *गोरी गोरी जरा बतियाँ मानो मोरी**गे गे गेली जरा टिंबक टू**काठमांडू काठमांडू गेली हूँ**झुमरू* मधील *मैं हूँ झुम झुम झुम झुमरू* हे गाणं किशोरनीच लिहिलं....
निर्माते आर.सी.तलवार यांच्या *मेमसाब* मधे शम्मी कपूर , मीना कुमारी अशा कलाकारांसोबत किशोरचीहि भूमिका होती.हा चित्रपट पूर्ण झाला तरी तलवार काहि किशोरचे आधी ठरवलेल्या रकमेपैकी बाकी राहिलेले आठ हजार देईनात ! किशोरकुमार म्हणजे एक नंबरचा चलाख व अवलिया माणूस ! तो रोज रात्री बारा वाजता तलवार रहात असलेल्या अपार्टमेंटसमोर जाऊन आरडा ओरडा करू लागला : *गलीगलीमें शोर है , तलवार साला चोर है!* , *क्यों बे तलवार , किधर है मेरा आठ हजार?*
किशोरकुमारचा हा गोंधळ चार पाच मध्यरात्री झाल्यानंतर मात्र आसपास कुजबूज व झोपमोडीच्या तक्रारी सुरू झाल्या. शेजार्यांनी तलवारना पण जेंव्हा छेडायला सुरूवात केली तेंव्हा शेवटी खजील होऊन तलवार यांनी दुसर्यारात्री किशोरच्या हातावर उरलेले पैसे ठेवले !मंडळी , किशोरकुमारकडून हि हकिकत ऐकल्यावर दादा बर्मननी या किश्श्याचा उपयोग *चलती का नाम गाडी* मधे केला.नायिका मधुबाला किशोरकुमार या कारमेकॅनिककडे येते व गाडी दुरुस्त करून घेऊन जाते व पैसे द्यायचं विसरून जाते.गॅरेजचा मालक व किशोरचा मोठा भाऊ त्याला वसूलीसाठी मधुबालाकडे पाठवतो.आणि अशा प्रकारे तयार झालं किशोर मधुबालाच्या दारात जाऊन गातो ते गाणं *लेकिन पहले दे दो मेरा पाँच रुपय्या बारा आना*
किशोरकुमारचं एकंच लॉजिक होतं *पहले दाम फिर काम , दाम नहिं तो काम नहिं!* किशोरकुमारचा ड्रायव्हर हाच त्याचा सेक्रेटरी पण होता. किशोरने त्याला आपल्या तालमीत चांगलेच तयार केले होते.किशोर ज्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला जायचा , त्याचे पैसे हा ड्रायव्हर कम् सेक्रेटरी निर्मात्याकडून आधीच वसूल करायचा.पण हे सगळं आपल्याला कळण्यासाठी किशोरने एक युक्ति करून ठेवली होती.गाण्याचे मानधन आधी मिळालेलं असेल तर हा ड्रायव्हर किशोरला रेकॉर्डिंग रूममधे चहा नेऊन देत असे.मग साहेब रेकॉर्डिंगला उभे रहात.पण चहा आला नाहि की किशोर समजून जाई की पैसे मिळालेले नाहित! मग किशोर संगीतकाराला *गळा खराब आहे!* असं सांगून तिथून चटकन निघून जात असे !
असंच एकदा तो *चहा न मिळाल्याने* रेकॉर्डिंगरूममधून निघून जाऊ लागला तेंव्हा त्याच्या ड्रायव्हरला आठवण करून द्यावी लागली की *साहेब , आज आपल्याच चित्रपटातील गाण्याचं रेकॉर्डिंग आहे , तुम्हिच निर्माते आहात मग चहा कुठून मिळणार?*किशोरकुमारच्या बंगल्यावर एक पाटी होती : *किशोरपासून सावध रहा!* आधी वेळ न ठरवता अचानक गेलेल्या पत्रकारांवर किशोर अक्षरश: कुत्र्यासारखे ओरडायचा व पळता भुई थोडी करून सोडायचा !
एच. एस. रवैल या निर्माता—दिग्दर्शकाने किशोरकुमारचे काहि पैसे देणं बाकी होतं जे वारंवार मागूनहि तो देत नव्हता.पण एकदा अचानक रवैलने किशोरच्या घरी जाऊन दारातंच त्याच्या हातावर सारी बाकी ठेवून दिलगिरी व्यक्त केली व हस्तांदोलनासाठी हात पुढे केला.तेंव्हा किशोरने त्याच्या हाताचा चक्क चावा घेतला व त्याला बंगल्यावरची पाटी दाखवली ! ती वाचून रवैल अक्षरश: सैरावैरा रापळत सुटला !
आता याविरूद्ध प्रकारातले हे २ किस्से ऐका : पै पै साठी जीव टाकणारा किशोर कधीकधी आपल्या पार्श्वगायनाचे पैसे परत करायचा. *मला हे गाणं खूप आवडलंय म्हणून हे गाणं गायचा मोबदला नको!* असं सांगून....राजेश खन्ना आणि डॅनी डेन्झोंग्पा यांच्या दोन दोन गाण्यांचे पैसे किशोरने असे परत केलेत !अरूणकुमार मुखर्जी नावाचा एक उदयोन्मुख नट अचानक मृत्युमुखी पडला.त्याचा परिवार भागलपूरला रहात असे.त्यांची आर्थिक अडचण कळताच किशोरकुमारनं सलग ३ वर्षे आर्थिक मदत पाठवून दिली.कारण काय तर या अरूणकुमारनं किशोरच्या घडत्या काळात *तू प्रसिद्ध गायक बनशील!* असं भाकित केलं होतं!
कालिदास बतवाब्बल या फायनान्सरनं *हाफ टिकट* साठी भांडवल पुरवलं होतं ज्यात किशोर काम करत होता.किशोरच्या खोडसाळ वागणुकीमुळे चित्रपट पूर्ण होण्यास विलंब लागत होता.वारंवार विनवूनहि किशोरच्या असहकार्यामुळे चिडलेल्या कालीदासनं आयकर अधिकार्यां किशोरच्या आर्थिक उलाढालींची माहिती दिली व त्यानंतर त्यांनी किशोरच्या घरावर धाड टाकून त्याला चार लाख रुपये दंड केला.किशोरनं वकिलाकरवी केस लढवून थोडाफार दंड कमी करवून घेतला.पण कालिदासला धडा शिकवायचं ठरवलं.किशोरनं किलिदासला घरी बोलावलं.त्याला चहापाणी देऊन झाल्यावर *हात धुण्यासाठी इथे बाथरूम आहे असं सांगून आत पाठवलं.* वास्तविक ती बाथरूम नसून कपड्यांचं भलं मोठं कपाट होतं.कालिदास आत जाताच किशोरनं दार बाहेरून बंद करून घेत कुलूप लावलं.कालिदास आत बराच वेळ आरडाओरड करून थकून गेला.पण शय्यागृृत ते कपाट होतं व शय्यागृह एअर कण्डिशण्ड व साऊण्डप्रूफ असल्यामुळे हा गोंगाट बाहेर कुणालाच ऐकू गेला नाहि.२ तासानंतर कालिदासला तिथून बाहेर काढत दम भरला : *माझ्या वाटेला जाणार्यां मी असाच धडा शिकवतो , समझे बच्चू?*
किशोर ज्यावेळी चित्रपटात काम करत होता त्यावेळी अनेकवेळा तो रेकॉर्डिंगला यायचाच नाहि. अशावेळी त्याची गाणी नाइलाजास्तव इतर गायकांकडून गाऊन घ्यायची नामुश्कि संगीतकारांवर ओढवत असे! शंकर—जयकिशनसारखे अत्यंत बिझी संगीतकार किशोरचे हे नखरे कसे सहन करतील ? आपल्या या विक्षिप्त स्वभावामुळे किशोरने स्वत:चं खूपंच नुकसान करून घेतलं !
आता तुम्हाला सांगतो *आनंद* या हृषिकेश मुखर्जींच्या सिनेमाबद्धल ! किशोरला घेऊन केलेल्या आपल्या *मुसाफिर* ला अपयश आल्याने किशोरच्या व्यक्तिमत्वाला व स्वभावाला सूट होईलशी भूमिका किशोरला देऊन सिनेमा काढण्याचं हृषिदांच्या फार मनात होतं.त्यामुळे *आनंद* ची कथा सुचताच त्यांना किशोरच आठवला.पण कथा बरीच वर्षे निर्मात्याअभावी पडून राहिली.शेवटी जेंव्हा एल,बी.लछमनने कथा स्वीकारल्यावर हृषिदांनी किशोरकुमारला भेटून विचारलं , *एका चित्रपटात काम करण्याचे व त्यातील गाणी म्हणण्याचे असे दोन्हि मिळून तू किती पैसे घेशील?*यावर शब्दांत न अडकता किशोर म्हणाला , *तुम्हि काय देणार ते बोला मग मी माझी रक्कम सांगतो!*
दोघांनीही आपआपली रक्कम एका कागदावर लिहिली.पण हृषिदांची रक्कम बघून किशोर आनंदून जात म्हणाला , *म्हणूनंच मी तुम्हाला माझी रक्कम सांगत नव्हतो!माझ्या अपेक्षेच्या दुप्पट पैसे तुम्हि देताय!* तिथल्या तिथे हृषिदांनी दिलेला अॅडव्हान्स खिशात टाकत किशोरने करारावर सहि केली.
पण नंतर स्वस्थचित्ताने विचार केल्यावर किशोरला त्या व्यवहारात तोटा जाणवू लागला.ताबडतोब तो हृृषिदांकडे गेला आणि म्हणाला, *प्रत्येक गाण्याचे मी दहा हजार घेतो आणि दिवसाला ३ गाणी रेकाॅर्ड करतो.वीस दिवसांच्या शूटिंग तारखा तुम्हाला दिल्यावर माझे दररोजचे किती पैसे बुडतील ते तुम्हिच मला सांगा!* आणि किशोरने करार रद्द केला ! पै पै च्या हिशोबामुळे आपण काय *आनंद* गमावला हे सिनेमा पाहिल्यावर किशोरला कळलं पण तोवर वेळ निघून गेली ना राव !
आपल्या विक्षिप्त स्वभावामुळे किशोरचं भवितव्य गायक म्हणून लोप पावत चाललं होतं.दादा बर्मन सोडल्यास इतर संगीतकार किशोरकुमारकडे पार्श्वगायक म्हणून बघायलाहि तयार नव्हते.ज्या चित्रपटाचा तो नायक असे , त्याच चित्रपटातील गाणी त्याच्या आवाजात रेकॉर्ड केली जायची.आणि अगदी अचानक आशेचा किरण गवसला.....१९६९ ला शक्ति सामंताने *आराधना* काढला आणि जतिन ऊर्फ राजेश खन्ना व किशोरकुमार दोघांच्याहि कारकिर्दीच्या उभारीची *आराधना* फळाला आली ! वयाच्या ४० व्या वर्षी *कोरा काग़ज़* ने खूप सारं यश किशोरच्या झोळीत टाकलं ! रातोरात किशोर स्टार झाला..... एकिकडे राजेश खन्ना म्हणजे किशोरकुमार तर दुसरीकडे देव आनंद म्हणजे पण किशोरकुमार असं समीकरण बनलं.किशोरला रेकॉर्डिंगला वेळ पुरेनासा झाला. *आराधना* नंतर *प्रेम पुजारी* , *अमरप्रेम* , *कटी पतंग* , *बुढ्ढा मिल गया* , *पराया धन* , *पडोसन* ..... दादा बर्मननंतर पंचमनं किशोरला खुलवत नेलं , सोबतीला लता व नशिल्या आवाजाची मलिका आशा होतीच ! पण यशावर आरूढ असतानाहि , किशोरचे पाय जमिनीवरंच होते! तो विक्षिप्त होता , पण अहंकारी नव्हता , माजोरडा नव्हता ! पाकिटात रफीचा फोटो बाळगायचा! एकदा काहि काॅलेजकुमार त्याला भेटायला हाॅटेलवर गेले.रूमवर जाता जाता ट्रॅन्झिस्टरवर लागलेलं रफीचं गाणं प्रसंगावधान दाखवत एकाने रूममधे शिरण्यापूर्वी बंद केलं.सहि देता देता किशोर इतकंच म्हणाला , *गाणं बंद का केलंत? रफीसाहेबांइतका थोर गायक अख्ख्या फिल्म इण्डस्ट्रीत शोधून सापडणार नाहि!* रफीनेहि किशोरला नेहेमी आपल्या धाकट्या भावाप्रमाणेच वागवलं.
रफी गेला तेंव्हा जनाज़ा उचलेपर्यंत किशोर रफीच्या पायाशी अश्रू ढाळत बसला होता....
मंडळी आता मी तुम्हाला किशोर कुमारचे आणखीन काही किस्से सांगतो ...आपल्या विक्षिप्त वागण्यामुळे किशोर कुमारने आपल्या आयुष्यात स्वतःचं खूप काहि नुकसान करून घेतलं ! पण त्याच्याविषयी ऐकू येणार्या काही प्रवादांविषयी मी तुम्हाला आता सांगणार आहे.१९५८ च्या *रागिणी* मधील *मन मोरा बावरा निसदिन गाए गीत मिलन के* हे गाणं मोहम्मद रफीने किशोर कुमारांसाठी गायलेलं पहिलं गाणं होतं. या गाण्याविषयी नेहमी एक प्रवाद असा ऐकू येतो की शास्त्रीय सुरावटीत हे गाणं असल्यामुळे किशोर कुमारच्या गळ्याला झेपणारं नव्हतं , त्यामुळे हे गाणं मुद्दाम त्याच्यासाठी रफीच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलं गेलं ! पण ही गोष्ट अजिबात खरी नाही ! *रागिणी* मधे नायकाची भूमिका सुरुवातीला भारत भूषण करणार होता आणि *बैजू बावरा* नंतर गायकाच्या भूमिकेतील भारत भूषणची जनमानसामध्ये जी प्रतिमा तयार झाली होती ती लक्षात घेऊन हे गाणं मोहम्मद रफीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. पण पुढे भारत भूषण ऐवजी किशोर कुमार या चित्रपटाचा नायक झाला. त्यामुळे त्याच्या आवाजात नव्याने *मन मोरा* हे गाणं रेकॉर्ड करताना उगाचच खर्च होऊ नये म्हणून रफीच्या आवाजातील गाणं या चित्रपटात कायम ठेवण्यात आलं आणि ते किशोर कुमारला आपण स्वतः गायक आहोत हे विसरून गावं लागलं!
*रागिणी* नंतर सुद्धा किशोर कुमारने *अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी , कभी हसा दिया रुला दिया कभी* हे १९५९ सालच्या *शरारात* मधील आणि १९५६ सालच्या *भागम् भाग* मधील *हमें कोई गम है* व *मसिहा बन के बीमारों के चले हो कहाँ करके जी बेकरार* अशी दोन गाणी रफीच्याच आवाजात गायली. यावेळीही असा प्रवाद ऐकला की किशोर कुमारला क्लासिकल बेस किंवा सॉफ्ट गाणी गाता येत नाहीत म्हणून ही दिली नसतील ! पण ते खरं नाही , कारण या का काळात कौटुंबिक जीवनातील अशांततेमुळे किशोर कुमार मुलखाचा बेभरोशी झाला होता आणि वेळ देऊनही रेकॉर्डिंगला येत नव्हता ! यामुळेच साठच्या दशकाच्या सुरुवातीला अनेक निर्मात्यांना याची भूमिका असलेल्या चित्रपटात रफीचा आवाज द्यावा लागला !कल्याणजी आनंदजींनी जेंव्हा *खई के पान बनारसवाला* या *डॉन* मधल्या गाण्यासाठी किशोर कुमारला बोलवलं आणि रेकॉर्डिंगसाठी ज्यावेळी किशोरकुमार स्टुडिओमध्ये आला त्यावेळी किशोरने कल्याणजी आनंदजींना सांगितलं की *मला हे गाणं गाण्यासाठी बनारसी पान हवं आहे , पान खाता खाता मी हे गाणं गाणार आहे !*
झालं ! किशोर कुमारची ही मागणी ऐकल्यानंतर सगळ्यांची धावपळ सुरू झाली. बनारसी पान काही कोणाला मिळालं नाहि , पण कलकत्ता पान मिळालं आणि ते पान मोठ्या आवडीने चघळतंच किशोर कुमार ने *खैके पान बनारसवाला* हे गाणं म्हटलं. किशोरच्या *टायमिंग* चा हा प्रसंग एक उत्तम उदाहरण आहे !
दुसरा किस्सा आहे तो *पडोसन* मधील : *एक चतुर नार करके सिंगार* या गाण्याचा ! याची चाल आर.डी.ची होती. पण या गाण्यामधे किशोरने रेकॉर्डिंगच्या वेळेला स्वतःच्या अशा काही जागा टाकल्या होत्या व या त्याला अगदी उत्स्फूर्तपणे सुचल्या होत्या आणि त्यामुळे त्या गाण्यांमध्ये आणखी धम्माल आलि. पण मन्ना डे चा मात्र असा गैरसमज झाला की किशोरने मला डॉमिनेट करण्यासाठीच हे सगळे कारस्थान केलंय! पण प्रत्यक्षात हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर मात्र मन्ना डे ची खात्री पटली की हे सगळ किशोरला उत्स्फूर्त पणे सुचलंय आणि नंतर मन्ना डे ने किशोरला कडकडून मिठी मारली !
असंच एक गाणं किशोर कुमारने मन्ना डे बरोबर म्हटलं होतं *अमीर गरीब* मधलं *तू मेरे प्यारे में शराब डाल दे फिर देख तमाशा*. हे जरी द्वंद्वगीत असलं तरी लक्ष्मीकांत प्यारेलालने मन्ना डे च्या आवाजात प्रथम गाणं रेकॉर्ड केलं आणि नंतर किशोरच्या तारखा मिळाल्यानंतर किशोरच्या आवाजात रेकॉर्डिंग केलं. आणि मग दोन्ही गाण्यांचं मिक्सिंग करून एकत्र द्वंद्वगीत तयार केलं.
पण झालं काय की , मन्ना डे ने त्याच्या नेहमीच्या शास्त्रोक्त ढंगाने ते गाणं गायलं आणि लक्ष्मीकांतला तो ढंग खूप आवडला आणि त्याने त्याच ढंगात किशोरला पण गायला सांगितलं आणि मनस्वी किशोरने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला ! *तुला जर तोच ढंग हवा असेल तर मन्ना डे च्याच आवाजात पूर्ण गाणं गाऊन घे* असं सांगून किशोर निघून जाऊ लागला. त्यावेळेला लक्ष्मीकांतने किशोरला त्याच्या ढंगात ते गाणं गायला सांगत रेकॉर्ड केलं. गाणं जेव्हा मिक्सिंग झालं त्यावेळेला लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीच्या लक्षात आलं की किशोरच्या खऱ्या खुल्या आणि खोल बॅरिटोन आवाजात गायलेल्या गाण्यापुढे मन्ना डे च्या रियाजी शास्त्रोक्त गाळ्याचं काम बिम केलेलं गाणं कुठल्या कुठे वाहून गेलेलं आहे! असा होता किशोरच्या आवाजाचा करिश्मा !
किशोरच्या आवाजामध्ये रफीचा मधाळ पणा , तलतचा मुलायम रेशमी स्वर किंवा मुकेशचा अनुनासिक स्वर कधीच जाणवला नाही तरी देखील किशोरचा आवाज वेगळा होता , मर्दानी होता , त्यात एक प्रकारचा गोडवा होता , मुलांचा निरागसपणा होता , खट्याळपणा होता , व्रात्यपणा होता आणि म्हणून किशोर हा मनस्वी गायक होता ! रफी आणि मन्ना डे सारखी शास्त्रोक्त गाणी कदाचित किशोरच्या वाटय़ाला आली नसतील पण म्हणून त्याचं *रंगोली सजाओ रे* किंवा *मेरे नैना सावन भादो* या सारखे गाणं शास्त्रीय बेस असून सुद्धा कधीही कानाला खटकलं नाही !
१९६९ च्या *आराधना* नंतर किशोर कुमार युग सुरू झालं . पडद्यावरच्या प्रत्येक नायकाला किशोरचा आवाज शोभू लागला — राजेंद्र कुमार , जाॅय मुखर्जी , सुनील दत्त , शम्मी कपूर , जितेंद्र , धर्मेंद्र या सगळ्यां तर किशोर कुमार सर्रासपणे गाऊ लागलाच पण दादा बर्मनने मागचा पुढचा सगळा वचपा काढण्यासाठी अभिनय सम्राट दिलीप कुमारसाठी *सगीना* मध्ये किशोर कुमारचा आवाज वापरला *साला मैं तो साब बन गया * व *ऊपर वाला दुखियों की नाही सुनता रे* अशी *सगीना* मधली गाणी किशोरकुमार ने हिट केली !देव आनंदसाठी सुद्धा रफीच्या आवाजाला प्राधान्य देणारा शंकर जयकिशनने *मैं सुंदर हूँ* मध्ये विश्वजित ला किशोरकुमारचा आवाज दिला ! तसंच ओ.पी. नय्यरने पण महेंद्र कपूरला बाजूला करून *एक बार मुस्कुरा दो* मध्ये किशोरकुमारला जवळ केलं !
मंडळी , आता मी तुम्हाला सांगणार आहे किशोर कुमारच्या खासियती बद्दल म्हणजेच या यॉडलिंग बद्दल ! युरोपमध्ये प्रचलित असलेला स्वीस आणि ट्रायोलॉजी गाण्याच्या पद्धतीचे अनेक प्रयोग *जिमी रॉजर्स* हा कलाकार करत होता. किशोरने जिमी रॉजर्सच्या सगळ्या ध्वनिमुद्रिका ऐकून हा प्रकार आत्मसात केला आणि कालांतराने ती स्वतःची ओळख बनवली!
किशोर स्वत: एक उत्तम अभिनेता होता. त्यामुळे गाणं कुणासाठी गातोय आणि कोणत्या प्रसंगासाठी गातोय याचं त्याला पुरेपूर भान असायचं आणि म्हणूनच किशोर कुमार हा देव आनंद , राजेश खन्ना , अमिताभ , धर्मेंद्र या सगळय़ांचे आवाज अगदी बेमालूमपणे काढायचा !
किशोर कुमार ने आपल्या चित्रपटातील एक तरी मराठी गाणं गायला पाहिजे अशी अभिनेता सचिनची मनापासून इच्छा होती . त्यासाठी त्याने किशोर कुमारची भेट घेतली व मराठी गाणं गाण्याची गळ घातली ! किशोरने लगेच हात झटकून सचिनला सांगितलं की *मराठी गाणं नको रे बाबा ! मला तुमच्या मराठी गाण्यातील ळ , च या अक्षरांची खूप भीती वाटते !* त्यावर सचिनने *ळ , च अक्षर न येणारं गाणं जर मी गायला दिलं तर तू गाशील क्?* असं विचारलं. त्यावर किशोर लगेच म्हणाला , *हो मग मी ते गाणं गायला लगेच तयार होईन !* सचिनने कविवर्य शांताराम नांदगावकरांना हा सगळा किस्सा ऐकवला आणि त्यांना सांगितलं की *ळ , च ही अक्षरं नसलेलं गाणं मला किशोर कुमारसाठी लिहून द्या !* आणि शांताराम नांदगांवकरांनी हे गीत लिहून दिलं *गम्मत जम्मत* या चित्रपटासाठी :
*अश्विनी ये ना , जगू कसा तुझ्याविना मी राणी गं , कशीही जिंदगीत आणिबाणी गं , तू ये ना प्रिये*रेकॉर्डिंगच्या वेळी संगीतकार अरूण पौडवाल यांनी पाहिलं की अनुराधा पौडवालसोबत हे गाणं गाताना किशोरकुमारने अगदी नाचत नाचत धम्माल उडवून दिली ! एरवी गाणं रेकाॅर्ड झाल्यावर लगेच निघून जाणार्या किशोरने या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंर हे गाणं संपूर्णपणे ऐकलं आणि नंतर सचिनच्या पाठीवर मिश्किलपणे थाप टाकून किशोरकुमार निघून गेला !
या गाण्यानंतर सचिनवर खुश झालेल्या किशोर कुमारने सचिनच्याच *माझा पती करोडपती* या चित्रपटामध्ये *अगं हेमा माझ्या प्रेमा , तुझी माझी जोडी जमली गं* हे गाणं पण म्हटलं .
मंडळी , आता मी तुम्हाला सांगणार किशोर कुमारचं मधुबालाशी लग्न कसं झालं हि हकीकत !
मधुबालाशी लग्न करण्याच्या इच्छेखातर किशोर कुमारने काय काय नाटकं केली हे तुम्ही ऐकलं तर तुमची हसून हसून मुरकुंडी वळेल ! दिलीपकुमार बरोबरच्या ब्रेकअपनंतर आणि स्वतःच्या हृदयाच्या कमकुवतपणाच्या आजारांमुळे मधुबाला खचत चालली होती आणि ती चमत्कारिक मानसिक अवस्थेतून जात असताना तिचे किशोरकुमारबरोबर *ढाके की मलमल* , *महलों के ख्वाब* आणि *झुमरू* या चित्रपटाततून कामं चालू होती. *चलती का नाम गाडी* या चित्रपटाचे शूटिंग चालू असताना किशोरकुमारने तिचं प्रियाराधन सुरू केलं होतं आणि त्याच्या प्रेमाची गाडी पुढे सरकू लागली होती. त्याने तिला विचारलं , *दिलीपच्या आठवणीत तू झुरून झुरून मरून जायचे ठरवले आहे का ?* त्यावर मधुबाला म्हणायची , *मग मी काय करू ?कोण आहे माझं या वीराण ज़िंदगीमधे?* यावर किशोर तिला सांगायचा , *मी आहे ना , मी तुझी सगळी काळजी घेईन. तुझ्या वर प्रेमाचा वर्षाव करीन. तुला फुलासारखी जपेन. तुला सुखात ठेवेन. तू फक्त हो म्हण! आपण लग्न करू !* त्यावेळेला मधुबाला त्याला सांगायची की *तुझी बायको रुमा माझी चांगली मैत्रीण आहे. मी तिला धोका देऊ शकत नाही !* तेव्हा किशोर तिला सांगायचा , *तिला धोका दे असं कुठे मी म्हणतोय ? तीच माझ्याबरोबर सारखी भांडत असते , मला नावं ठेवते ! तूसुद्धा समजावलंस ना तिला ? काय उपयोग झाला ? आमच्यात आता कसलेच प्रेम जिव्हाळा व आपुलकी राहिली नाही ! तिला घटस्फोटच घ्यायचा आहे ! त्यातून तू माझ्या जीवनात आलीस , मला केवढा दिलासा मिळतोय निव्वळ तुझ्या दर्शनाने !*
१९५० साली रूमा गुहा ठाकूरता बरोबर लग्न केलेल्या या पहिल्या बायकोपासून किशोरकुमार १९५८ ला विभक्त झाला.यानंतर किशोर कामाने खरोखरच कमाल केली !किशोर कुमार मीनाकुमारी बरोबर *शरारात* नावाच्या चित्रपटात काम करत होता. चित्रपटाच्या नावावरूनच जाणवलं असेल तुम्हाला की किशोर चित्रपटात कशी मस्करी करणाऱ्या नायकाची भूमिका करत असेल ! त्यावेळी मधुबालाचे अनेक चित्रपट तयार होत होते आणि त्यातला एक होता *बरसातकी रात* ज्यात तिचा नायक होता भारत भूषण आणि भारत भूषण ची पत्नी सरला हि मधुबालाची जिवलग मैत्रीण होती ! याच दरम्यान सरलाचं आकस्मित निधन झालं .त्या वेळेला तिच्या मृत्यूनं मधुबालाला विलक्षण दु:ख झालं ! भारत भूषणचं दुःख हलकं करण्यासाठी ती मधून मधून त्याच्या घरी जायची आणि त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगून त्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करायची. याचाही वृत्तपत्रांनी भलताच अर्थ काढला आणि *मधुबाला भारत भूषण बरोबर लग्न करण्याच्या विचारात आहे* अशी बातमी प्रसिद्ध केली. वास्तविक मधुबालाच्या मनात त्यावेळी असा कुठलाही विचार नव्हता. तिला भारत भूषण बद्दल अपार करूणा वाटत होती आणि त्याचं दुःख व उदासी काही अंशी तरी कमी व्हावी एव्हढाच तिचा हेतू होता !
किशोरकुमारने ही बातमी वृत्तपत्रात वाचली आणि तो भलताच बिथरला ! *शरारत* चं त्या दिवसाचं शूटिंग संपल्यानंतर तो औषधांच्या दुकानात गेला. तिथे झोपेच्या गोळ्यांची एक बाटली खरेदी केली , त्यातल्या सगळ्या गोळ्या काढून दुसऱ्या बाटलीत ठेवल्या आणि मोकळी बाटली हातात घेऊन तो सरळ मधुबालाच्या घरी जाऊन पोहोचला ! घरात शिरताना त्याचे पाय लटपटत होते आणि तोल जात होता. मधुबालाची धाकटी बहिण चंचल हिने त्याला सरळ मधुबालाच्या खोलीत नेला. तो खोलीत शिरला व धाडकन कॉटवर कोसळला. त्याच्या एका हातात रिकामी बाटली होती आणि दुसर्या हाती चिठ्ठी होती. मधुबालाला खरंच काही कळेना , की हा काय प्रकार आहे ? किशोर तर गरागरा डोळे फिरवत आणि असंबद्ध असं काहीतरी बरळत होता... *मैं जा रहा हूँ... हमेशा के लिए... इस नादान दुनिया को छोड़कर जा रहा हूँ... इस दुनिया में मेरा कोई नहीं हैं ...ना मैं किसी का हूँ ..अलविदा मधू , अलविदा !*
मधुबालाच्या सांगण्यावरून चंचलने किशोरच्या हातातली बाटली काढून घेतली आणि तिने पाहिलं , त्यावर *पाॅयझन* शब्द लिहिला होता ! तो शब्द ऐकताच मधुबालानं किशोरच्या हातातली चिठ्ठी काढून घेतली आणि ती वाचू लागली.... किशोरने त्यात लिहिलं होतं :*मेरी प्यारी मधु ,**अगर तुम किसी और से शादी करना चाहती हो तो जरूर करो.... तुम्हारी खुशी में ही मेरी खुशी समाई है ! लेकीन तुम्हारे बगैर मैं जी नहीं सकता ! इसलिए मैं इस बेदर्द दुनिया को छोड़कर हमेशा हमेशा के लिए जा रहा हूँ ! मेरी मधुको मेरी मौत के लिए जिम्मेदार मत ठहराना ...अलविदा ...अलविदा ...अलविदा ...**तुम्हारा अभागी किशोर*ही चिठ्ठी वाचली मात्र , विव्हळ स्वरात मधुबाला बोलू लागली , *ऐसा मत कहो किशोर , मैं और किसी के साथ शादी नहीं करूंगी ,तुम्हें छोडकर कहीं भी नहीं जाऊंगी ! मैं वादा करती हूं , लेकिन तुम होश में आओं किशोर ! होशमें आओ !*मधुबालाचं हे बोलणं ऐकताच किशोर ताडकन उठून बसला आणि तिचा हात धरून म्हणाला , *यह वादा पक्का है ना ? फिर कसम खाके वादा करना कि तुम मेरी हो जाओगी , सिर्फ मेरी !*
मधुबाला आणि तिची बहिण चंचल यांना किशोरचं हे सारं नाटक असल्याचं लक्षात आलं !चंचल हसू लागली. मधुबालालाही हसू आलं , कारण तिच्या हृदयावर पडलेला असह्य ताण हलका झाला होता ! अशाप्रकारे किशोरने मधुबालाला स्वतःशी लग्न करायला राजी करून घेतलं !परंतु मधुबालाशी लग्न करणं एवढं सोपं होतं का महाराजा ? मधुबालाचे वडील अताउल्लाह खान याने किशोरला मुसलमान होण्याची अट घातली. तीही त्याने मान्य केली आणि तो मुसलमान झाला ! त्याचं नाव ठेवलं गेलं *अब्दुल करीम* अशा प्रकारे किशोरकुमार आणि मधुबालाचं लग्न झालं — ती तारीख होती १६ ऑक्टोबर १९६० . यानंतर मधुबाला आजाराचं निदान करण्यासाठी आणि इलाज करून घेण्यासाठी किशोर कुमारबरोबर लंडनला गेली . सगळा खर्च किशोरकुमारने केला.परंतु मधुबालाचा आजार फार पुढच्या स्टेजला गेला होता आणि ऑपरेशन अशक्य होतं आणि डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त दोन ते तीन वर्षांची मुदत दिली होती. तरीही मधुबाला तिथून पुढे ९ वर्षे जगली.मधुबालाचा आजार इतका बळावत गेला की तिला पुढे पुढे काम करवे ना आणि त्याच्यामुळे केवळ मधुबालाच्या चित्रपटात काम करण्यावर अवलंबून असणारं तिचं संपूर्ण घरदार निराधार झालं ! असेल नसेल ते सगळं विकून टिकून खाण्याची नौबत आली....किशोरने तिच्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं आणि तिच्या आजारपणातील खर्चामुळे त्याच्यावर कफल्लक होण्याची पाळी आली.२१ फेब्रुवारी १९६९ ला मधुबाला किशोरला सोडून या जगातून निघून गेली.....यानंतर किशोरकुमारने तिसरे लग्न योगिता बाली शी १९७६ ला केले व ते ४ ऑगस्ट १९७८ पर्यंत टिकले. म्हणजेच किशोरच्या ४९ व्या वाढदिवसापर्यंत!किशोरकुमारने १९८० साली लीना चंदावरकर शी लग्न केले. किशोर यांना रुमापासून अमित कुमार व लीनापासून सुमित कुमार असे २ मुलगे आहेत.किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट:पडोसन(१९६८)दूर गगन की छाँव में (१९६४)गंगा की लहरें (१९६४)मिस्टर एक्स इन बाँम्बे (१९६४)हाफ टिकट (१९६२)मनमौजी (१९६२)झुमरू (१९६१)चलती का नाम गाडी (१९५८)दिल्ली का ठग (१९५८)आशा (१९५७)न्यू दिल्ली (१९५६)बाप रे बाप (१९५५)मिस माला (१९५४)नौकरी (१९५४)
किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहेत. त्यांचे गायक म्हणून गाजलेले काही चित्रपट:मिस्टर इंडिया (१९८७)सागर (१९८५)शराबी (१९८४)अगर तुम ना होत (१९८३)सत्ते पे सत्ता (१९८२)नमक हलाल (१९८२)लावारिस (१९८१)राॅकी (१९८१)याराना (१९८१)कर्ज़ (१९८०)मुकद्दरका सिकंदर (१९७८)डॉन (१९७८)अनुरोध (१९७७)शोले (१९७५)खुशबू (१९७५)जुली (१९७५)आंधी (१९७५)मीली (१९७५)पोंगा पंडित (१९७५)रोटी (१९७४)कोरा कागज़ (१९७४)अभिमान (१९७३)यादों की बारात (१९७३)परिचय (१९७२)रामपुर का लक्ष्मण (१९७२)बोँम्बे टू गोवा (१९७२)मेरे जीवन साथी (१९७२)हरे राम हरे कृष्ण (१९७१)अमर प्रेम (१९७१)अंदाज़ (१९७१)बुढा मिल गया (१९७१)शर्मीली (१९७१)प्रेम पुजारी (१९७०)कटी पतंग (१९७०)प्यार का मौसम (१९६९)पडोसन (१९६८)ज्वैल थीफ (१९६७)गाइड (१९६५)तीन देवीयाँ (१९६५)दूर गगन की छाँव में (१९६४)मिस्टर अँक्स इन बोँम्बे (१९६४)हाफ टिकट (१९६२)मनमौजी (१९६२)झुमरू (१९६१)दिल्ली का ठग (१९५८)नौ दो ग्यारह (१९५७)पेइंग गेस्ट (१९५७)फंटूश (१९५६)हाऊस नम्बर ४४ (१९५५)मुनिमजी (१९५४)टैक्सी ड्राईवर (१९५४)जाल (१९५२)बाजी (१९५१)बहार (१९५१)
किशोरकुमारने १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यानी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.*एक कलाकार म्हणून किशोरकुमार अत्यंत मनस्वी होता ! कुणाचीहि भीडभाड तो ठेवत नसे!* इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोरकुमारने जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमारच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचला तरी कफल्लक झाला. यावर उपाय म्हणून तो देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागला. त्यांत त्याला अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोरकुमारचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरी किशोरकुमार स्टेजवर येतच राहिला.
किशोरकुमारला ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे :( *साल गाणं चित्रपट संगीतकार गीतकार* ) या क्रमाने१९६९ *रूप तेरा मस्ताना* — *आराधना* सचिन देव बर्मन—आनंद बक्षी१९७५ *दिल ऐसा किसी ने* — *अमानुष* श्यामल मित्रा—इंदिवर१९७८ *खैके पान बनारसवाला* — *डॉन* कल्याणजी-आनंदजी—अनजान१९८० *हज़ार राहें मुडके देखीं* — *थोडीसी बेवफाई* खय्याम—गुलज़ार१९८२ *पग घुँघरू बाँध* — *नमक हलाल* बप्पी लहिरी—अनजान१९८३ *हमें और जीने की* — *अगर तुम ना होते*राहुल देव बर्मन—गुलशन बावरा१९८४ *मंजिलें अपनी जगह* — *शराबी* बप्पी लहिरी—प्रकाश मेहरा१९८५ *सागर किनारे* — *सागर* राहुल देव बर्मन—जावेद अख्तर
२१ फेब्रुवारी १९६९ मधे प्रीय पत्नी मधुबालाच्या मृत्यूनेही जेवढा किशोर खचला नसेल तेवढा स्वतःच मोठ्या भावजयीच्या म्हणजेच अशोककुमारचा बायकोच्या मृत्यूने कोसळला ! हळूहळू त्याच्या जीवनातला रस संपुष्टात येऊ लागला .अशोककुमारच्या पत्नीचं निधन होऊन दोन दिवस लोटले होते. तिसर्या दिवशी दादामुनींनी किशोरला घरी बोलावलं आणि किशोर आल्यानंतर त्याला म्हणाले , *मला तुझं जिंदगी का सफर है ये कैसा सफर , कोई समझा नही कोई जाना नही* हे गाणं गाऊन दाखव !
आपल्या मोठ्या भावाची फर्माईश ऐकून किशोरकुमारची अवस्था अत्यंत दयनीय झाली !भावजयीच्या मृत्यूमुळे झालेल्या जखमेवर खपली धरली नव्हती आणि थोरला भाऊ गायला लावत होता ...तेही *जिंदगी का सफर है ये कैसा सफर* या सारखं करुणेनं ओथंबलेलं गाणं ! किशोरच्या डोळय़ातून घळाघळा अश्रू वाहू लागले ....अचानक त्यांची नजर दादामुनींकडे गेली !कसलेला नट असूनही दादामुनींना आपल्या भावना आवरल्या नाहीत ....त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा वाहत होत्या. थकलेलं शरीर थरथरत होतं. पुढच्या ओळी गाता येणं किशोरला अशक्य झालं ! एखाद्या लहान मुलासारखा हंबरडा फोडून तो आपल्या भावाच्या कुशीत शिरला !
*किशोरला अनेक पुरस्कार मिळाले होते पण त्यांच्या दृष्टीने दादामुनीने त्याला केलेली ही फर्माईश हा सगळ्यात मोठा पुरस्कार होता !* भावजयीच्या निधनामुळे किशोर कुमार खऱ्या अर्थाने खचला ! विदूषकाचा खोटा मुखवटा घेऊन तो या मायानगरीत वावरत होता . विक्षिप्त पणाचा शिक्का त्याच्या कपाळावर मारला गेला होता , तो पण त्याने जन्मभर विना तक्रार सांभाळला ! पण हृदयामध्ये अत्यंत संवेदनशील आणि हळवं असं एक मन लपलं होतं !त्याची करूण गाणी ऐकताना आपल्याला नक्की याचा प्रत्यय येतो ! या संवेदनशील मनाने त्याने *दूर गगन की छांव में* , *दूर का राही* यासारखे चित्रपट निर्माण केले पण लोकांनी त्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद दिला नाही.,.., त्यांना हवा होता तो फक्त धांगडधिंगा करणारा याॅडलिंग करणारा किशोर कुमार ! या सगळ्याचा हळूहळू किशोरला उबग येऊ लागला. त्याला असं वाटू लागलं की आता आपण गावी जाऊन राहावं ! त्याच्या खांडवाच्या फेऱ्या वाढू लागल्या ...
*माझ्या जन्मगावी मला शांती मिळते !* असं तो कायम बोलू लागला ! त्याची एक इच्छा होती की *दूर पर्वताच्या शिखरावर एकटं जाऊन तिथे मनमोकळ्या हवेत मनमुराद गात रहावं!* कदाचित या इच्छेपोटीच त्यांच्या सिनेमांची नावं *दूर का राही* , *दूर गगन की छांव में* अशी असावीत.... नंतरच्या काळात त्याला गाण्यात पण रुची राहिली नाही.
हळूहळू सिनेसंगीताचा घसरत चाललेला दर्जा , चाललेला उथळपणा , संगीतकार गीतकारांची बाजारू वृत्ती यामुळे त्याची गाण्यांवरचा वासनाच उडून गेली ...किशोर उघड उघडपणे म्हणू लागला की *पूर्वीचे संगीतकार एकेका गाण्यावर केवढी मेहनत घ्यायचे आणि आम्हालाही मेहनत घ्यायला लावायचे... स्वरांचा चढउतार , उच्चार , हरकती हे सगळं व्यवस्थित जमण्यासाठी ८ — ८ दिवस रिहर्सल चालायची ! तेव्हा कुठे ती गाणी अजरामर व्हायची! आजकाल एखादा संगीतकार फोन करून सांगतो की उद्या आपण रेकॉर्डिंग करू. संध्याकाळ पर्यंत मी गाण्याची टेप पाठवून देतो. अशा परिस्थितीत रिहर्सल कधी करायची ? त्या गाण्यातील कवीच्या भावना कशा समजून गायच्या? असं कधी गाण्याचं रेकॉर्डिंग होतं काय ? सगळेच बाजारू बनले आहेत ...स्पर्धेत टिकण्यासाठी फक्त बाजारू वृत्ती टिकून आहे !*
नंतर नंतरच्या काळात किशोरचा गाण्यातला रस कमी होत गेला आणि म्हणून त्यांच्या गाण्यांची संख्या पण कमी होत गेली. १३ ऑक्टोबर १९८७ ... अशोककुमारचा त्याचेशी वाढदिवस होता आणि अशोककुमारच्या वाढदिवसासाठी किशोरकुमार तिकडे जायला निघाला होता . परंतु अचानक त्याच्या छाती मध्ये कळ आली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याने या जगाचा आणि आपल्या सार्या रसिक जनांचा निरोप घेतला ! त्याचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांडव्याला नेण्यात आला.
मंडळी , मला खरच कळत नव्हतं की *१३ ऑक्टोबर या दिवशी मी अशोककुमारची जयंती म्हणून अशोककुमारवर लेख लिहायला हवा की १३ ऑक्टोबर ला किशोरकुमारची पुण्यतिथी म्हणून किशोरकुमार वर लेख लिहायला हवा ?*पण शेवटी हरहुन्नरी कलाकार आणि सबकुछ असलेला किशोर कुमार याच्या आठवणींनी माझं मन भरून आलं आणि मी हा लेख लिहायला घेतला.....मंडळी किशोर कुमार स्वतः विक्षिप्त स्वभावाचा होता आणि त्याची त्याला पुरेपूर जाणीव होती आणि म्हणूनच मला खरोखर या क्षणी असं वाटतंय की कदाचित तो त्याच्याच एका गाण्यातून आपल्याला असं विचारत असावा की....
*मेरे दीवानेपनकीभी दवा नहिं , मेरे दीवानेपनकीभी दवा नहिं , मैंने जाने क्या सुन लिया , तूने तो कुछ कहा नहिं , मेरे दीवानेपनकीभी दवा नहिं !*बा किशोर , तुझ्याच गाण्याच्या शब्दांत बदल करून तुला इतकंच सांगावसं वाटतं रे की *पल पल दिलके पास तुम रहते हो , जीवन मीठी प्यास ये कहते हो* ..... रडवलंस की रे माझ्या मनस्वी दोस्ता ! शेवटी १३ ऑक्टोबरला स्वत:चं पाळण्यातलं नांवच सार्थ ठरवत मागे फक्त *आभास* उरला रे सोन्या.....