भारतात कोरोना बळींचा आकडा वाढतच चालला आहे. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जवळपास 1.14 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 75.5 लाख लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सध्या देशात 7.7 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. तर 66.6 लाख लोक बरे झाले आहेत.
ही आकडेवारी दिलासा देणारी आहे. कारण अद्याप कोरोनावर लस आलेली नाही. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 579 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 55,722 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाचा वेग कमी होऊ लागला आहे. दिल्लीमध्ये 3299 नवे रुग्ण सापडले असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 75 लाखांवर गेला असून 7,72,055 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण मृत्यू 1,14,610 झाले आहेत. 66,63,608 रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 20,000 हून कमी कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 50000 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आयसीएमआरनुसार (ICMR) 18 ऑक्टोबरपर्यंत कोरोनासाठी एकूण 9,50,83,976 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 8,59,786 चाचण्यांची तपासणी रविवारी करण्यात आली.
हरियाणामध्ये गेल्या साडेचार महिन्यांत पहिल्यांदाच एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 952 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यानुसार हरियाणामध्ये एकूण 1,640 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट येणारदरम्यान, लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली.
देशातल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचं नेतृत्त्व व्ही. के. पॉल यांच्याकडे आहे. 'गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली आहे,' अशी माहिती पॉल यांनी दिली.
सध्याच्या घडीला काही राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं पॉल यांनी सांगितलं. केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह ३-४ केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं पॉल म्हणाले. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र संकट अद्याप कायम आहे,' असं पॉल म्हणाले. हिवाळ्याच्या दिवसांत देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते का, असा प्रश्न विचारला असता पॉल यांनी युरोपमधील परिस्थितीचा संदर्भ दिला. 'हिवाळा सुरू होताच युरोपमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढू शकतो,' असं पॉल यांनी म्हटलं.