- टेकचंद सोनचणे लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होऊन तिसरी लाट आली असली तरी, दिल्लीत पुन्हा लाॅकडाऊन करणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसामध्ये दिल्लीत कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली. दररोज सहा हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण समोर येऊ लागले. पराली जाळल्याने झालेल्या प्रदूषणात फटाक्यांमुळे अजूनच विष पसरले.
रुग्ण वाढत असले तरी राज्य सरकारही सर्व परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे. लाॅकडाऊन हा काही प्रभावी उपाय नाही. सर्वांनी मास्क घाला, सॅनिटायझर वापरा. आपण कोरोनाला नक्कीच पराभूत करू, असा विश्वास वाढवण्याचा प्रयत्नही जैन यांनी केला आहे. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे.रुग्णवाढीचा आकडा हळहळू स्थिर झाला असून, आता त्यात घट होत आहे. दिवाळी सुरू होईपर्यंत दिल्लीत सहा हजारापेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळत होते. हा आकडा सात हजारावरही गेला होता. परंतु रविवारी ३,२३५ रुग्ण आढळले. जूनमध्ये सरासरी ३७ टक्के लोकांना कोरोनाची लागण होत होती, आता १५ टक्क्यापर्यंत हा आकडा आला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत कोरोनाचा सामना करण्यासाठी आढावा बैठक घेतली. केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयांमध्ये समन्वयाने काम होत आहे. दिल्लीत ८,७०० खाटांवर सध्या रुग्ण आहेत तर ७,९०० खाटा अद्याप रिकाम्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढले तरी सर्वांना उपचार मिळतील. रविवारी २१ हजार ९८ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी सर्वाधिक भर ११,१८७ ॲन्टिजन टेस्टवर होता.. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा लाॅकडाऊनची चर्चा सुरू आहे. अनेक व्यापारी संघटनांनी त्यावर चिंता व्यक्त केली होती. राज्य सरकारलादेखील लाॅकडाऊन न करण्याची विनंती केली. वारंवार सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवेमुळे सत्येंद्र जैन यांनी स्पष्टीकरण दिले.दिल्लीत आतापर्यंत ४ लाख ८५ हजार ४०५ लोकांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील ४ लाख ३७ हजार ८०१ जण ठणठणीत बरे झाले आहेत. ७ हजार ६१४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत ३९ हजार ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
७५० आयसीयू बेड सज्ज दिल्लीत दररोज सव्वालाख चाचण्या करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र व राज्य सरकारने आखली आहे. याशिवाय केंद्रीय रुग्णालयांमध्ये ७५० आयसीयू बेडदेखील सज्ज ठेवले जातील.