सबरीमालात प्रचंड गर्दी; केरळात १२ तासांचा बंद, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:38 AM2018-11-18T05:38:13+5:302018-11-18T06:19:05+5:30
मल्याळी वृश्चिकोम महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली.
पंबा/संनिधानम (केरळ) : मल्याळी वृश्चिकोम महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली. अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काही संघटनांनी केरळात १२ तासांचा बंद पुकारल्यामुळे काही शहरांत जनजीवन विस्कळीत झाले.
दोन महिन्यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी मंदिर उघडले. पहाटे तीन वाजता नवे मेलशांती (मुख्य पुजारी) वासुदेवन नंबुद्री यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पूजाविधींना सुरूवात झाली. दर्शनासाठी मंदिराबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. गर्दी लक्षात घेऊन केरळ परिवहन महामंडळाने बसची व्यवस्था केली आहे. या बसगाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन सुरूच आहे. हिंदू ऐक्य वेदीच्या प्रदेशाध्यक्ष के. पी. शशिकला यांना शुक्रवारी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी अटक केली. रात्री मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असताना त्यांनी मंदिरात प्रवेशाचा हट्ट धरल्याने त्यांना अटक करण्यात आली. अन्य एका संघटनेच्या नेत्यासही अटक करण्यात आली आहे. यावरून काही संघटनांनी १२ तासांच्या केरळ बंदची हाक दिली आहे. (वृत्तसंस्था)
बंदमुळे लोकांना त्रास
बंदमुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. बलरामपुरम येथे एका बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तिरुवनंतपुरममध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. रुग्णालयांनाही आंदोलनाचा फटका बसला.
अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सरकार सबरीमाला यात्रा संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एस. जे. आर. कुमार यांनी शशिकला यांच्या अटकेचा निषेध केला.