बंगळुरू - केंद्र सरकारकडून 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील हुलिकल गावच्या 106 वर्षीय आजीबाईंच नाव आहे. झाडांवर प्रेम करणाऱ्या या आजीबाईच नाव आहे सालुमार्दा थिमक्का. तब्बल 106 वर्षीय आजींच्या पर्यावरणप्रेमी कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे.
झाडांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत. त्यानंतर, या आजीबाईंनी चक्क झाडं लावण्याचा सपाटाच सुरू ठेवला. त्यामुळे थिमक्कांना आता 'सालुमार्दा थिमक्का' असं नाव मिळाल आहे. सालुमार्दा म्हणजे एका रांगेत लावलेली झाडं. त्यामुळं त्यांच्या गाडीवर 'सालुमार्दा थिमक्का' असं लिहिलेल आहे.
कोणाच्या शेतात काम कर, मजुरी कर असं चालू असताना त्यांना एक धक्का बसला. तो म्हणजे लग्न होऊन भरपूर काळ उलटला तरी या दांपत्याला मूल झालं नाही. मूल न होणं हे वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख असलं तरी हुलिकलसारख्या गावात ते सहन करणं कठिणच होतं. नातेवाइकांचे टोमणे मारणं, गावातल्यांनी चिडवणं असल्या प्रकारातून या दोघांनाही मन रमवण्यासाठी काहीतरी हवंच होतं. शक्य त्या सगळ्या देवळांमध्ये जाऊन डोकं ठेवून झालं पण थिमक्का-बिक्कलू यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. त्यावेळी, गावजवळच रस्त्याच काम सुरू होत. या रस्त्याच्या बाजुने एका रांगेत झाडं लावण्याच काम थिमक्कानं सुरू केलं. दररोज एक एक करत तब्बल 384 वडाची झाडं थिमक्काने लावली आणि त्या झाडांची निगाही राखली. विशेष म्हणजे जवळपास 4 किमीचा पट्टा दुतर्फा झाडं लावून थिमक्काने निसर्गमय बनवला आहे.
अन् थिमक्का सर्वदूर पसरल्या
थिमक्कांचं हे काम बाहेरच्या जगाला कधी समजलं असं उमेशला विचारलं. तर तो म्हणाला, एकदा इथून कर्नाटकातलेच एक खासदार जात होते. गाडीमध्ये अचानक अस्वस्थ वाटू लागल्यावर ते खाली उतरले आणि या झाडांच्या सावलीत बसले. थोड्यावेळात त्यांना बरं वाटलं. पण ही सगळी एका रांगेत कोणी झाडं लावली असं त्यांनी विचारलं तेव्हा त्यांना थिमक्कांचं नाव समजलं. त्यानंतर, खासदारमहोदयांनी सरळ थिमक्कांचं घर गाठलं आणि त्यांचे आभार मानले. नंतर जाताना थिमक्कांच्या हातचं सुग्रास जेवण जेवूनच त्यांना निरोप धाडण्यात आला. हा सगळा अनुभव त्यांनी पुढच्या एका कार्यक्रमात सांगितला. झालं. तेव्हापासून थिमक्काची ओळख सर्वदूर पसरत गेली. आत्तापर्यंत थिमक्काला निसर्गप्रेमी आणि पर्यारवरणवादी संस्थांकडून शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने थिमक्काच्या या निस्वार्थ भावनेनं केलेल्या निसर्गरोपणाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.
पद्मश्री पुरस्कार काय आहे, हे मला माहीत नाही. या पुरस्कारानं माझं पोट भरत नाही. मला दरमहा 500 रुपये पेन्शन मिळायची. मी वारंवार ती पेन्शन वाढविण्याची मागणी केली. पण, अद्याप त्यात कुठलाही वाढ न झाल्यानं मी ती पेन्शन घेणही बंद केल्याचं थिमक्का सांगतात. प्रशासनाचा निष्काळजीपणा व शासनकर्त्यांच्या अनास्थेमुळे कधी कधी अशा प्रेरणादायी व्यक्तींवर आणि त्यांच्या कार्यावर अन्याय होतो.