गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरु असलेली शेतकरी आंदोलने मोडीत काढण्यासाठी सुरुवात केली आहे. एक दिवस आधी मध्यरात्री बागपतच्या बरोट येथील शेतकर्यांचे आंदोलन मोडीत काढले आहे.
यानंतर गुरुवारी मथुरामध्ये डीएम आणि एसएसपी यांनी चर्चा करून शेतकर्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले आहे. तर आता उत्तर प्रदेशातील गाझीपूर सीमेवरील सर्वात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी मोठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना यूपी गेट आंदोलनाची जागा रिकामी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आजच आंदोलनाची जागा रिकामी होऊ शकते. जिल्हा प्रशासन व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. यूपी गेटवरील आंदोलनाची जागा रिकामी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना अल्टीमेटम देण्यात आला आहे.
आज रात्रीपर्यंत आंदोलनाची जागा रिक्त होऊ शकते. जिल्हाधिकारी अजय शंकर पांडे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनाची जागा रिकामी करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत पालिकेच्यावतीने आंदोलनात शेतकर्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. या सुविधांमध्ये प्रामुख्याने पाण्याची सोय, तसेच शौचालय आणि स्वच्छतेची व्यवस्था करणे यांचा समावेश असतो.
दरम्यान, गाझीपूर सीमेवरील गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी फ्लॅग मार्चही करण्यात आला.
तसेच, गाझीपूरमधील शेतकऱ्यांनी आपले तंबू हलविण्यास सुरूवात केली आहे. गाझियाबाद पोलीस-प्रशासन रात्रीपासूनच गस्त घालत आहे. मेरठ विभागाचे आयुक्त एडीजी, मेरठ रेंजचे आयजी रात्रीपासून येथे तळ ठोकून आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील पोलीस व प्रशासकीय अधिकारीही याठिकाणी उपस्थित आहेत.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात पोलिसांसोबत झालेल्या कराराचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर का कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, याप्रकरणी पूर्व दिल्ली पोलीस ठाण्यात राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.