नवी दिल्ली - बनावट नोटांचा वापर करून लोकांना फसवल्याच्या घटना या अनेकदा समोर येत असतात. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही कारण शाईच्या मदतीने खोट्या नोटा ओळखणं आता अधिक सोपं होणार आहे. 'अदृश्य शाई' ने बनावट नोटा ओळखता येणार आहेत. ग्रेटर नोएडा येथील शिव नाडार विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी खोट्या नोटा ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारची शाई विकसित केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी कमी किंमतीतील अदृश्य शाई विकसित केली आहे. महत्त्वाची कागदपत्रं आणि बनावट नोटा ओळखण्यासाठी या शाईचा उपयोग होणार असून किफायतशीर किंमतीत ती उपलब्ध होणार आहे. या आधीही अशा पद्धतीच्या शाईचा वापर हा करण्यात आला आहे. मात्र ती शाई तयार करण्यासाठी अनेक घटकांचा वापर करण्यात आला असून नव्या शाईच्या तुलनेत ती अधिक महाग असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शिव नाडार विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तयार केलेली अदृश्य शाई ही आधीच्या शाईपेक्षा अधिक सुरक्षित आहे. तसेच कमी किंमतीत उपलब्ध असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच या नव्या शाईची माहिती जर्नल ऑफ फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये देण्यात आली आहे. शिव नाडार विद्यापीठातील प्राध्यापक देवदास रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही विकसित केलेल्या पांढऱ्या सुरक्षा शाईतील घटक सहज उपलब्ध होणारे आहेत. ही शाई स्वस्त असून सूर्याच्या प्रकाशात त्याचा वापर केला जातो'.
सुरक्षा आणि ट्रॅफिक फलक, वैद्यकीय तपासणी अशा ठिकाणी वापरले जाणारे आहेत. Ultraviolet Light च्या संपर्कात आल्यावर ही शाई चमकते. नवी शाई तयार करण्यासाठी 45 मिनिटं इतका वेळ लागत असून या शाईची किंमत प्रतिग्रॅम एक हजार रुपये आहे. आकृत्या, चित्रे, बारकोड असे विविध प्रकार या शाईने रेखाटता येणार असून पांढऱ्या कागदावर या शाईने लिहिल्यास अतिरिक्त सुरक्षा पुरवणे शक्य होणार आहे. या शाईचा उपयोग बँकेत नोटा, अधिकृत कागदपत्रे, संरक्षणविषयक कागदपत्रे तयार करण्यासाठी होणार असल्याची माहिती मिळत आहे.