नवी दिल्ली, दि. 25 : नवी दिल्लीत बहिण-भावाचा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैशासाठी एका व्यक्तीनं आपल्या बहिणीचा निर्घून खून केला. हत्या करण्यापूर्वी त्याने तिचा 50 लाख रुपयांचा विमा काढला. बहिणीच्या विम्याची 50 लाखाची रक्कम मिळविण्याच्या नादात स्वत:च रचलेल्या षडयंत्रात फसल्याने त्याची पोलखोल झाली आणि पोलिसांनी अवघ्या ४८ तासात त्याच्या मुसक्या आवळल्या.बुराडीच्या अजित विहारमध्ये मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजता पोलिसांना एक फोन आला. एका महिलेची तिच्या पतीने हत्या केली, असं फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं आणि हा भयानक प्रकार उघडकीस आला. अनिता असं या मृत महिलेचं नाव असून ती पटनाची रहिवासी आहे. पोलीस तपासात अनिताचा भाऊ कमलने त्यानेच फोन केल्याची कबुली दिली आहे. तो आरएमपी डॉक्टर असून शेजारीच प्रॅक्टिस करतो. कमलचे दोन विवाह झालेले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालेलं आहे. दोन्ही पत्नींपासून त्याला 8 मुलं आहेत.गेल्या चार-पाच वर्षापासून त्याच्यावर 12 लाखाचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडणं त्याला अशक्य होत होतं, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.सप्टेंबर 2016 रोजी रक्षाबंधनची भेट म्हणून त्याने बहिणीचा 50 लाखाचा विमा उतरवला होता. बहिणीला मुल नसल्याने त्याने विम्यावर स्वत:चे नाव वारस म्हणून नोंदविले होते. विम्याचे हप्तेही त्यानेच भरले होते. मंगळवारी पहाटे संधी साधून तो बहिणीच्या घरात घुसला आणि झोपेत असलेल्या अनिताचा गळा दाबून तिचा खून केला. पोलीस तपासात त्याने सुरूवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला, असं पोलिसांनी सांगितलं.