नवी दिल्ली : देशातील पहिल्या ‘ग्रीन बिल्डिंग’ला म्हणजे राजधानीतील नवीन पर्यावरण भवनाला मंगळवारी भेट दिल्यावर संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून इमारतींची वैशिष्ट्ये पाहून सुखावले. पाहणीनंतर सर्वच ठिकाणी अशा इमारतींची बांधणी केली जावी, असे मत मून यांनी व्यक्त केले.केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या भवनात पाणी, हवा व प्रकाश यांची अचूक सांगड कशी घातली गेली, याची माहिती मून यांना दिली. पर्यावरण भवनच्या पाच इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, बदलत्या पर्यावरणाचा परिणाम या इमारतीवर कसा होतो ते सांगून, ऊर्जा बचत करणारी लिफ्ट या इमारतीत पहिल्यांदाच बसविण्यात आली आहे, असे जावडेकर यांनीसांगितले.येथील झाडांचे वेगळेपण त्यांनी विशद केल्यानंतर मून यांनी जावडेकर यांना सोबत घेऊन एका रोपाला पाणी दिले. इमारतींच्या पाहणीनंतर सौर व पवन ऊर्जेचा वापर करताना इमारतीची बांधणी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असू शकते असा अभिप्राय नोंदवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा पध्दतीच्या इमारतींची गरज असल्याचे मून म्हणाले. भारताने पुढाकार घ्यावा- बानचालू वर्षाच्या अखेरीस पॅरिसमध्ये होणाऱ्या अर्थपूर्ण हवामान बदल कराराबाबत भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी येथे केले आहे.संयुक्त राष्ट्राचे हवामान संमेलन यंदा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यात हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने एक जागतिक करार केला जाणार आहे. याबाबत भारताच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असल्याचे मत बान यांनी व्यक्त केले असून, संयुक्त राष्ट्राचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून नावारूपाला येत असलेल्या भारताने हवामानाविषयीचे उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, असे म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पर्यावरण भवनाची ‘ग्रीन बिल्डिंग’पाहून मून सुखावले!
By admin | Published: January 14, 2015 12:38 AM