नवी दिल्ली, दि. 9 - संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी बुधवारी टि्वटकरुन काँग्रेस नेते अहमद पटेल यांना गुजरात राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. शरद यादव यांनी अशा प्रकारचे टि्वट करुन थेट पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. कारण जदयूचे सर्वोच्च नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुजरातमधील जदयूच्या एकमेव आमदाराला भाजपा उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. शरद यादव यांच्या टि्वटवरुन त्यांच्यात आणि नितीश कुमारांमधील अंतर्गत मतभेदांची दरी अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होते.
मागच्या महिन्यात नितीश कुमार काँग्रेस आणि राजदबरोबरच्या महाआघाडीतून बाहेर पडले आणि भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असल्याने नितीश कुमारांनी गुजरातमधील आपल्या आमदाराला अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश दिले होते. जदयूचे आमदार छोटूभाई वासवा यांनी कोणाला मतदान केले ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपाने गरीबांसाठी फार काही केलेले नाही त्यामुळे आपण अहमद पटेल यांना मतदान केले असे सांगितले. नितीश कुमारांचा सत्ता स्थापनेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय शरद यादव यांना अजिबात पटलेला नाही. आघाडी झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी नितीश कुमारांवर टीका केली होती.
मंगळवारी रात्री गुजरात राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी बाजी मारली. त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने कसलेली कंबर, पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी रंगलेले राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपाच्या अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.काल गुजरात राज्यसभेच्या दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री निवडणूक आयोगाने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या वाघेला गटातील दोन आमदारांचे मत रद्द करण्याचा निर्णय दिला.