जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या वाहने जात असताना एका कारमधील सिलिंडरचा स्फोट झालेल्याची घटना ताजीच असताना दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला केला. हे बंकर स्टेट बँकेच्या बाहेर होते. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे.
पुलवामामध्ये स्टेट बँकेच्या बाहेर असलेल्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे, असे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. जवानांची कुमक घटनास्थळी पोहोचली असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.
तर बारामुल्लातील एका चौकात दहशतवाद्याने स्थानिक नागरिकाला गोळ्या घालून ठार केले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्याजवळ शनिवारी (30 मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.