ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 30 - जम्मू-काश्मीरमधील सोपोरच्या मुख्य मार्केटमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोपोरमधील मुख्य मार्केटमध्ये पोलीस गस्तीवर जात असताना दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष केले. येथील पोलीस स्टेशनपासूनजवळच्या अंतरावर हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या ग्रेनेड हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
याआधीही, जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील पोलीस कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये एक नागरिक जखमी झाला होता. येथील इमाम साहिब येथील पोलीस कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. मात्र, कॅम्पच्या रस्त्यावर ग्रेनेड पडल्याने मोठी दुर्घटना टळली होती.
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बँक लुटण्याच्या आणि पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकून 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर कुलागाम येथील एका बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत 50 लाखांच्या रोकड लुटली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पोलिसांचा समावेश होता. तसेच, दोन गार्डचीही समावेश होता.
J&K: Terrorists hurled grenade at a Police party near J&K Bank in Sopore. 4 Police personnel injured. pic.twitter.com/no6X5Ty7qP— ANI (@ANI_news) May 31, 2017