लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आॅनलाइन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी अॅमेझॉन डॉट कॉमला भारतातील किरकोळ खाद्य विक्री क्षेत्रात गुंतवणुकीस परवानगी मिळाली आहे. या परवान्याच्या आधारे अॅमेझॉन खाद्य आणि किराणा वस्तूंचा साठा करून किरकोळ स्वरूपात विकू शकेल. भारतात अॅमेझॉनची फ्लिपकार्टसोबत स्पर्धा आहे. भारतातील किरकोळ खाद्य विक्री क्षेत्रात प्रवेशाची परवानगी मिळाल्याच्या वृत्ताला अॅमेझॉनकडून अधिकृत दुजोरा मिळाला आहे. तथापि, यासंबंधीचा तपशील देण्यास कंपनीने नकार दिला आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, खाद्य क्षेत्रात अॅमेझॉन ५00 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. भारतातील विविध क्षेत्रांतील गुंतवणूक ५ अब्ज डॉलरवर नेण्याचा निर्धार कंपनीने आधीच व्यक्त केला आहे. भारतात आॅनलाइन खरेदीला मोठी गती मिळाली आहे. स्वस्त स्मार्टफोन, इंटरनेटचा प्रसार आणि सवलती यामुळे आॅनलाइन शॉपिंगला पसंती मिळत आहे. गॅझेटपासून ते कपडे आणि खाद्यवस्तंूपर्यंत सर्वच क्षेत्रांत आॅनलाइन शॉपिंग होत आहेत. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न अॅमेझॉन करीत आहे.दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या विक्रीत अजूनही किराणा दुकानांचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रात संघटित प्रतिष्ठानांना मोठी संधी आहे. सध्या अॅमेझॉन भारतात अॅमेझॉन पॅन्ट्रीच्या माध्यमातून खाद्य उत्पादने विकते. आपल्या अॅमेझॉन नाऊ अॅपच्या माध्यमातून कंपनी विविध किराणा वस्तूंची ‘त्याच दिवशी पोहोच’ या तत्त्वावर आॅनलाइन विक्री करते. त्यासाठी अॅमेझॉनने बिग बाजार, स्टार बाजार आणि हायपरसिटी या किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारी केली आहे. अॅमेझॉन आॅनलाइन आॅर्डर स्वीकारते. प्रत्यक्ष वस्तू पोहोचविण्याच्या कामी भागीदार कंपन्या साह्य करतात. >फ्लिपकार्टचाही प्रयत्नभारतातील अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनेही किराणा सामान विक्री क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न चालविला आहे. फ्लिपकार्टची टायगर ग्लोबल, टेन्सेन्ट होल्डिंग्ज आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांसोबत भागीदारी आहे. अॅमेझॉनने गेल्याच महिन्यात किराणा सामान विक्री क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी होल फूड मार्केट आयएनसी खरेदी करण्याच्या योजनेची घोषणा केली होती. हा व्यवहार १३.७ अब्ज डॉलरचा आहे.
बड्या आॅनलाइन कंपन्याही विकणार किराणा
By admin | Published: July 13, 2017 12:05 AM