उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डीजेवर सुरू असलेल्या गाण्यांच्या तालावर नाचण्यासाठी आलेल्या नवरदेवाच्या भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या काही क्षणापूर्वी जल्लोषाचे वातावरण होतं. नवरदेवाच्या भावाला मृत्यूने गाठताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मुबारिकपूर गावातील धर्मेंद्र सिंह यांचा पुतण्या विशेष सिंहची लग्नाची वरात सात मार्चला मैनपुरी येथे जाणार होती. घरात उत्सवाचं वातावरण होतं. कुटुंबाने 6 मार्च रोजी नातेवाईक आणि ग्रामस्थांसाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. रात्री डीजेवर सर्वजण नाचत होते.
नातेवाईकांनी विशेषचा चुलत भाऊ सुधीर याला नाचण्यासाठी बोलावलं. सुधीर नाचत होता. त्याच दरम्यान तो अचानक जमिनीवर कोसळला. सुरुवातीला घरच्यांना नेमकं काय झालं ते काहीच समजलं नाही. यानंतर त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सुधीरच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. जिथे काही क्षणांपूर्वी जल्लोष साजरा झाला होता, तिथे शोककळा पसरली. वडील धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, डीजे वाजत होता आणि सर्वजण नाचत होते. मुलगा नाचायला आला. अचानक तो जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.