छत्तीसगडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीने पतीवर नपुंसक असल्याचा आरोप केल्याने त्याने मी नपुंसक असेन तर पत्नीची व्हर्जिनिटी टेस्ट करावी, मग खरे समोर येईल असा दावा करत कोर्टात मागणी केली होती. ही मागणी कौंटुंबिक न्यायालयाने फेटाळल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. तिथे त्याची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.
छत्तीसगड हायकोर्टाने ही मागणी असंविधानिक असल्याचे म्हटले आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, तर पत्नीने पती नपुंसक असल्याचा आरोप केला होता. यावर पतीने जर मी नपुंसक असेन तर पत्नी अजूनही व्हर्जिन असायला हवी, ती व्हर्जिन नसली तर एकतर मी नपुंसक नाही किंवा तिचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, हे सिद्ध होईल अशी मागणी केली.
रायगड जिल्ह्यातील एका तरुणाचे एप्रिल २०२३ मध्ये लग्न झाले होते. काही दिवस त्यांच्यात ठीक चालले होते. परंतू, काही महिन्यांतच त्यांच्यात वाद होऊ लागले. यानंतर पती-पत्नी वेगवेगळे राहू लागले. जुलै २०२४ मध्ये पत्नीने घटस्फोटासाठी आणि पोटगीसाठी कौंटुंबीक न्यायालयात अर्ज केला. यात तिने २० हजारांची पोटगी मागितली. आपला पती नपुंसक असल्याने शरीर संबंध ठेवण्यास सक्षम नाहीय असे कारण देत तिने आपल्याला व आपल्या कुटुंबाला अंधारात ठेवून लग्न करण्यात आल्याचा आरोप तिने केला होता.
तर पतीने तिला पोटगी न मिळण्यासाठी तिच्या चारित्र्यावर आरोप केले. तिचे तिच्या बहीणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. कौटुंबीक न्यायालयाने पतीचे आरोप फेटाळून लावत पोटगी देण्याचे आदेश दिले. याविरोधात पतीने हायकोर्टात जात पत्नीच्या तपासणीची मागणी केली आहे. यावर हायकोर्टाने कौमार्य चाचणी असंवैधानिक आहे आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करते, असे म्हटले आहे. तसेच नपुंसकतेचे आरोप चुकीचे सिद्ध करायचे असतील तर तो स्वतःची वैद्यकीय चाचणी करू शकतो, असे म्हणत त्याची याचिका फेटाळली आहे.