राजस्थानच्या झालावाडमध्ये घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सप्तपदी आधीच नवरदेवाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानपूर तहसीलमधील ओदपूर गावात ही घटना घडली आहे, जिथे नवरदेवाच्या मृत्यूनंतर कुटुंब आणि वधूला मोठा धक्का बसला.
27 वर्षीय बहादूर सिंह सकाळी शेतात पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेला होता. मोटारीला हात लावताच विजेचा झटका बसल्याने बहादूर सिंह तेथेच बेशुद्ध झाला आणि सकाळपर्यंत घरी न परतल्याने त्याचा भाऊ त्याला पाहण्यासाठी शेतात पोहोचला. बहादूर सिंह ट्रान्सफॉर्मरजवळ पडलेला होता, त्यानंतर त्याच्या भावाने त्याला ताबडतोब उचलले आणि कोटा जिल्ह्यातील सगोद सीएचसीमध्ये नेले जेथे डॉक्टरांनी वराला मृत घोषित केले.
घरामध्ये लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि नवरदेवाच्या मृत्यूने हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. बहादूर सिंहच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरचा विवाह कोटा येथील खुशबू कुमारी मीना नावाच्या मुलीशी बुधवारी, 22 फेब्रुवारी रोजी होणार होता. लग्नाबद्दल वधू आणि वर दोघेही खूप आनंदी होते. दोन्ही घरांमध्ये जोरदार तयारी सुरू होती आणि सजावटीबरोबरच निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या.
बहादूर सिंह याच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्याच्या वडिलांचे 17 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. नवरदेवाने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तो गावात शेतीची कामे करत होता. त्याचा धाकटा भाऊ रामविलास शिक्षण घेत आहे. बहादूरच्या मृत्यूची बातमी मिळताच वराच्या घरातच नव्हे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली. गावात वरातीऐवजी बहादूर सिंहच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"