लग्नाच्या सीझनमध्ये बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण मुंगेर जिल्ह्य़ातील आहे, जिथे लग्न समारंभ सुरू असलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील भुसा गली येथील दुर्गा प्रसाद यांचा एकुलता एक मुलगा 30 वर्षीय आशिष कुमार याचा विवाह 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.
एकुलत्या एक मुलाच्या लग्नामुळे दुर्गा प्रसाद य़ांच्यासह संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होते. वडिलांनी मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. पाटणा येथील रहिवासी अशोक कुमार सिंह आणि किरण कुमारी रंजन यांची मुलगी करिश्मा हिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला लग्नाची मिरवणूक मुंगेरला परतली, तर 16 फेब्रुवारीला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.
17 फेब्रुवारीला करिश्मा माहेरी गेली. करिश्मा आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर आशिष त्याच्या घरी पाहुण्यांची सेवा करण्यात व्यस्त राहिला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरात विखुरलेल्या वस्तू त्याने व्यवस्थित केल्या आणि रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो वडिलांना फोन करू लागला.
आशिष पलंगावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. त्याचे वडील व इतर कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचले तोपर्यंत आशिषचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. एकुलता एक मुलगा गमावल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.