उत्तर प्रदेशमधील बुंदेलखेडच्या महोबा जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. याच छळाला कंटाळून एका नवऱ्याने ज्याचं लग्न १८ जून रोजी होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांकडे मदतीची याचना केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, १८ जूनला माझं लग्न आहे आणि घोड्यावर बसून मला वरात काढायची इच्छा आहे. कोणी माझी मदत करू शकेल का? असं त्याने विचारलं आहे.
नवरदेवाच्या या सोशल मीडिया पोस्टनं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. स्वातंत्र्य भारतात आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी का नाही? असा संतप्त प्रश्न लोकं विचारू लागली आहे. ही सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. २२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोय. अलखरामचं लग्न १८ जून रोजी होणार आहे.
अलखराम ज्या गावात राहतो त्याठिकाणी दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. गावातील दबंग आणि उच्चवर्णीय लोक दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे घोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे. अलखरामच्या वडिलांनी महोबकंठच्या पोलीस ठाण्यात पत्र लिहून विनंतीही केली आहे.
महोबा जिल्ह्यातील महोबकंठ येथे माधवगंज नावाचं २ हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही दलित समाजातील नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. आतापर्यंत कोणत्याही दलित कुटुंबाने याचा विरोध केला नाही कारण गावातील काही दबंग लोकांची दहशत या लोकांच्या मनात कायम आहे. गावातील संकुचित विचारधारेचे लोक आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. या गावातील वृद्ध लोक सांगतात कोणत्याही दलिताला घोड्यावर बसून वरात काढता येत नाही.
उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या परिसरातील गावात स्वातंत्र्यानंतरही कोणत्याही दलित नवरदेवाला घोड्यावर वरात काढणं दूरच पण कार, बाईकवरूनही नवरदेव गावातून निघू शकत नाही. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते. आता अलखरामच्या सोशल मीडिया पोस्टनं जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परंतु काहीच करता येत नाही. मात्र भीम आर्मीनं यात उडी घेतली आहे. अलखरामची वरात घोड्यावरून काढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.