राजस्थानमध्ये दोन सख्ख्या बहीणींनी एकाच नवरदेवाशी लग्न केले आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातही असा प्रकार झाला होता. परंतू, राजस्थानच्या विवाहाची वेगळी कहाणी आहे जी तुम्हाला भावून करेल. या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांची संमतही होती. तसेच हे लग्न लपून छपून नाही तर मोठ्या तामझामात करण्यात आले.
टोंक जिल्ह्याच्या उनियारा मोरझालाच्या झोपडिया गावातील हा विवाहसोहळा आहे. नवरदेव हरिओम मीणा याने पदवी घेतली आहे. तर दोन बहीणींपैकी मोठीने उर्दूमध्ये एमए केले आहे. छोटी बहीण आठवीपर्यंत शिकली आहे. हरिओमच्या वडिलांनी मुलाचे स्थळ बाबुलाल मीणा यांची मोठी मुलगी कांतासाठी पाठविले होते. परंतू कांताने एक अट ठेवली, तरच लग्नास होकार असल्याचे सांगितले.
आपल्या छोट्या बहीणीशी देखील हरिओमने लग्न करावे, असे झाल्यासच पुढे बोलणी करू, असे तिने कळविले. सुरुवातीला नवरदेवाकडच्यांना काही कळेना, परंतू तिने यामागचे जे कारण सांगितले ते पाहुन नवरदेवाने होकार दिला. अशाप्रकारे कांता आणि सुमन यांचे पाच मे रोजी हरिओमसोबत लग्न झाले.
सुमन ही मानसिकदृष्ट्या थोडी कमजोर आहे. यामुळे कांताने नवरदेवाला तिच्यासोबतही लग्न करण्यास सांगितले. कांताच सुमनची काळजी घेते. जर तिच्या होणाऱया पतीने बहीणीशीदेखील लग्न केले तर ती भविष्यात देखील तिची काळजी घेत राहिल. यासाठी तिने ही अट घातली होती. जी दोन्ही कुटुंबांनी मान्य केली आणि लग्न लावून दिले.