नवी दिल्ली- बुधवारी द्वारकाच्या सायबर सेल विभागाने एका 41 वर्षीय व्यक्तीला अटक केली. स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं सांगत तो व्यक्ती मेट्रोमोनिअल साइट्सवर महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालत होता. या व्यक्तीने सहा महिलांना लुबाडलं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षापासून ही व्यक्ती महिलांना लग्नाची मागणी घालून व नंतर ब्लॅकमेल करून लुटत होती. अनुराग मेंदीरत्ता असं या माणसाचं नाव असून त्याने लखनऊमधून बीबीएचं शिक्षण घेतलं आहे. तसंच त्याने तीन खासगी बँकांमध्ये सेल्स मॅनेजरपदावर कामही केली आहे. या व्यक्तीकडून लुबाडलं गेलेल्या एका महिलेने गेल्यावर्षी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांना सापळा रचत अनुरागचा आयपी अॅड्रेस ट्रॅक करून त्याला अटक केली. दुसऱ्या एका महिलेनेही अनुराग विरोधात तक्रार दाखल केल्याचं तपासात समोर आलं आहे.अनुराग हा मेट्रोमोनिअल साइट्सवर टार्गेट फिक्स करायचा. त्यानंतर त्या मुलीच्या आवडीनिवडीनुसार स्वतःची फेक प्रोफाइल त्याच साइटवर तयार करायचा. एका प्रकरणात त्याने स्वतःची ओळख सिद्धार्थ वालिया अशी तयारी केली. आपण मुंबईतील एका स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं त्याने सांगितलं. तसंच स्वतःचा तसा फोटोही काढून घेतला. लग्नासाठी मुलीच्या शोधात असल्याचं सांगत त्याने एका मुलीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर महिलेकडून पैसे उकळण्यासाठी त्याने वडिलांना कॅन्सर असल्याची खोटी कहाणी तयार केली. एके दिवशी त्याने महिलेला युकेच्या नंबरवरून फोन केला होता. वडिलांच्या उपचारासाठी लंडनला आलो असल्याचं त्याने सांगितलं. त्यासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे, असं म्हणत त्याने त्या महिलेकडून पैसे उकळले.
अनुरागकडे असलेल्या एका डिव्हाइसवरून तो विविध देशातील आयएसडी कोड वापरून फोन करत होता. अनुरागचं फेक जिमेल आयडी त्याच्या फेसबुक व इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर लिंक होतं, अशी माहिती समोर आली आहे.काही दिवसांनी महिलेने पैसे परत मागितल्यावर अनुरागने तिला शिवीगाळ करायला सुरूवात केली. नंतर महिलेने मुंबईतील स्पोर्ट्स चॅनेलचं ऑफिस गाठलं. तेव्हा अनुरागची प्रोफाइल फेक असल्याचं तिच्या लक्षात आलं. अनुरागने सिद्धार्थ ऑबेरॉय नावाची प्रोफाइल तयार करत आणखी एका महिलेला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. दुबईमध्ये एका स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं सांगत त्याने महिलेला लग्नासाठी तयार केलं. व त्यानंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती.पोलीस चौकशीत अनुरागने सगळ्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे. माझं लग्न झालं असून मला एका मुलगा आहे. मी नोकरी सोडली व त्यानंतर प्रॉपर्टी डिलर म्हणून द्वारकामध्ये काम करतो आहे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, अनुरागच्या पत्नीला याबद्दल माहिती आहे की नाही? याबद्दलचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे.