राजस्थानच्या कोटामधील इटावा शहरातील एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी एक नवरदेव थेट हेलिकॉप्टरने पोहोचला. हेलिकॉप्टरने आलेल्या नवरदेवाला पाहण्यासाठी गावातील लोकांची मोठी गर्दी झाली होती. सुनील असं या नवरदेवाचं नाव असून त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलाने आपल्या सुनेला हेलिकॉप्टरने आणावे.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मपुरा रोड परिसरात प्रॉपर्टी डीलर कृष्णमुरारी प्रजापती राहतात. कृष्णमुरारी यांचा मुलगा सुनील याचा विवाह इटावा येथील रेखासोबत झाला. नववधू रेखा बीएडची तयारी करत असून वर सुनीलने एमए पूर्ण करून आयटीआय केले आहे. वडिलांसोबत प्रॉपर्टीचे कामही सांभाळतो. 26 जानेवारीला दोघांनी लग्न केलं
मुरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या 30 वर्षांपासून प्रॉपर्टीचे काम करत आहेत. मुलगा सुनीलचा 28 मार्च 2022 रोजी साखरपुडा झाला होता. त्याच दिवशी मनात इच्छा होती की मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसावे आणि वधूला घेण्यासाठी जावे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत संपर्क साधला. साडेसात लाख रुपयांत हेलिकॉप्टर बुक केले.
जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी परवानगी मागितली होती. प्रशासनाने 26 आणि 27 जानेवारीला परवानगी दिली. हेलिकॉप्टरमध्ये वरासोबत त्याचे आजोबा रामगोपाल, आजी रामभरोसी आणि सहा वर्षांचा भाचा सिद्धार्थ उपस्थित होते. इटावाला पोहोचताच मैदानावर लोकांची गर्दी जमली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"