भुवनेश्वर : ओडिशातील व्यावसायिक वाहनांच्या चालकांच्या संपाचा एका नवरदेवास चांगलाच फटका बसला. संपामुळे वाहनांची व्यवस्था न झाल्यामुळे नवरदेवासह सर्व वऱ्हाडी मंडळींना रात्रभर २८ किलोमीटर चालत-चालत नवरीच्या घरी पोहोचावे लागले. ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.
कल्याणसिंहपूर तालुक्यातील सुनाखडी येथून हे वऱ्हाड गुरुवारी रात्री पायी निघाले. रात्रभर चालून ते सकाळी दिबालापाडू येथे विवाहस्थळी पोहोचले. विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला. मात्र, या वऱ्हाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वऱ्हाडाचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. (वृत्तसंस्था)
कशासाठी आहे संप?-ओडिशातील वाहनचालकांची एक संघटना ‘एकता महासंघा’ने दिलेल्या माहितीनुसार, विमा, निवृत्तीवेतन आणि कल्याण बोर्ड स्थापन करण्याची वाहनचालकांची मागणी आहे. त्यासाठी ओडिशातील सर्व व्यावसायिक वाहनचालकांनी बुधवारी संपाची घोषणा केली होती. - वास्तविक, सरकारच्या आश्वासनामुळे चालकांनी आपला संप ९० दिवसांसाठी स्थगित केला आहे. ९० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास पुन्हा संप पुकारला जाईल, असे संघटनेने म्हटले आहे.
२२ वर्षीय नरेश प्रस्का असे नवरदेवाचे नाव आहे. लग्नस्थळी पोहोचण्यासाठी ते १६ मार्च रोजी निघाले. वऱ्हाडासाठी त्याने ४ एसयूव्ही वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र, चालकांच्या संपामुळे यापैकी एकही वाहन आले नाही. नरेशने सांगितले की, आम्ही आवश्यक सामान दुचाकी वाहनांद्वारे विवाहस्थळी पाठवून दिले. त्यानंतर ८ महिलांसह आम्ही सुमारे ३० वऱ्हाडी पायीच निघालो. हा अनुभव अविस्मरणीय राहिला, हे मात्र खरे. आमच्यासमोर अन्य कोणता पर्यायच नव्हता. कारण, एकही चालक चालण्यास तयार नव्हता.