उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात रात्री एक भीषण अपघात घडला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या तरुणाला मागून येणाऱ्या बसने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरूण नवरदेवाचा चुलत भाऊ होता. डीजेच्या तालावर तो आनंदात नाचत होता. त्यानंतर बसने त्याला चिरडल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रास्ता रोको केला.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची वरात उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील एका गावातून बिजनौरच्या चंदक पोलीस स्टेशन मंडावर परिसरात आली होती. रस्त्यावर वरातीत नाचणाऱ्या नवरदेवाच्या चुलत भावाला बसने मागून धडक दिली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी बैलगाडी व ट्रॉली रस्त्याच्या मधोमध उभी करून रस्ता अडवून धरला होता.
या घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीयांनी पोलिसांना मृतदेह उचलू दिला नाही. बस चालकाला अटक करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्याच्या मागणीवर ते ठाम होते. मात्र, खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. अखेर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिद्वार जिल्ह्यातील खानपूर पोलीस स्टेशनच्या जसपूर रणजीतपूर गावातील रहिवासी महावीर सिंह यांच्या मुलाच्या लग्नाची वरात आली होती. याच वरातीत जसवीर देखील नाचत होता. सर्वजण आनंदात होते. याच दरम्यान बालावलीकडे जाणाऱ्या बसने धडक दिली, यात जसवीरचा जागीच मृत्यू झाला.