नवी दिल्ली: एका जमातीनं माजी पंतप्रधानांची प्रतिमा खराब करण्याचं काम केल्याचं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोदींनी हा आरोप केला. आपलं सरकार सर्व माजी पंतप्रधानांचं एक संग्रहालय उभारेल, अशी घोषणादेखील पंतप्रधानांनी यावेळी केली. माजी पंतप्रधानांसोबतच अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचेदेखील प्रयत्न काहींकडून करण्यात आले, असा दावा करत मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. 'चंद्रशेखर यांची कामगिरी लोकांच्या मनातून पुसली जाईल, असे प्रयत्न केले गेले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांची कशी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचे प्रयत्न केले गेले?' असा सवाल मोदींनी उपस्थित केला. लालबहादूर शास्त्री जीवंत राहिले असते, तर त्यांची प्रतिमादेखील डागाळली गेली असती, असा दावा मोदींनी केला. चंद्रशेखर यांच्या विरोधात कट कारस्थान रचण्यात आलं, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला. आज एखादा लहान मोठा नेता १०-१२ किलोमीटरची पदयात्रा काढतो, तरीही त्याला वर्तमानपत्रात जागा मिळते. टीव्हीवर दिवसभर ती पदयात्रा दाखवली जाते. मात्र चंद्रशेखर यांनी गरिब शेतकऱ्यांसाठी काढलेल्या पदयात्रेला फारसं महत्त्वच देण्यात आलं नाही. त्यांच्या विचारांना विरोध असू शकतो. मात्र जाणूनबुजून त्यांची यात्रा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत ठेवण्यात आली, असं मोदी म्हणाले.