नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये फारच गोंधळ उडाला आहे. दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून आता संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)वर टीकेची झोड उठवली आहे.मी दहावीचा गणिताचा पेपर देऊन घरी परतलो आणि पेपर फुटल्याची बातमी ऐकून मला धक्काच बसला. त्यामुळे मला आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षण मंडळाचे अधिकारी काय करत असतात, असा प्रश्न एका विद्यार्थ्यानं उपस्थित केला आहे.तर दुस-या एका विद्यार्थिनीनं म्हटलंय की, सीबीएसईचे पेपर फुटल्यानं आम्हाला आता पुन्हा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागणार आहे. हे फारच हास्यास्पद आहे. मी पूर्ण वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केेला होता. पेपर फुटला त्यात माझा गुन्हा काय? मला आता असा वाटत आहे की एवढा अभ्यास करूनही पहिली परीक्षा दिल्यावर पहिले जेवढे मार्क्स मिळणार होतेे, त्यापेेक्षा पुन्हा परीक्षा दिल्यावर कमी मिळतील. खूप वाईट वाटत आहे आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागणार या कल्पनेने संताप होतोय, असंही आरुष मांजरेेेकर या विद्यार्थ्यानं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी या पेपरफुटीवरून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्या मुलालाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गोंधळाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनीही भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. सीबीएसईचे पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फुटतायत. त्यामुळे भारतात होणा-या परीक्षा तरी गैर प्रकारांपासून सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे नमो अॅपद्वारे आपली खासगी माहिती अमेरिकेत पोहोचत आहे, तरीही मोदी सरकार आधारची माहिती सुरक्षित असल्याचा दावा करणं हे हास्यास्पद आहे.