गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.पंतप्रधानपदाची वाटचाल करताना ‘गुजरात नो बेटो, देश नो नेतो’ अशी ज्यांची प्रतिमा तयार करण्यात आली, त्या मोदी व देशातील क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गृहराज्यात खरे तर त्यांच्या पक्षाला गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. सहज खिशात घालता येणारी ही निवडणूक ठरायला हवी होती. विकासपुरुष म्हणून दर्शविल्या गेलेल्या, ज्या ‘प्रतिमे’वर गेल्या लोकसभा निवडणुकीचे मैदान या पक्षाने अगदी एकहाती जिंकले, त्याच प्रतिमेवर यंदा ही वाढ अपेक्षित होती. खुद्द मोदी यांनीच तशी १५० जागांची अपेक्षा बोलून दाखविली होती. परंतु हा पक्ष गेल्या वेळच्या ११५ जागांपेक्षाही मागे राहिला.नोटाबंदी, जीएसटीचा व्यापारीवर्गाला बसलेला फटका, पटेल व शेतकरी आंदोलनाची झळ, धार्मिक ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेसनेही अनुसरलेला मंदिरमार्ग व या सर्वांच्या जोडीला सोशल इंजिनीअरिंग घडवून आणण्यात काँग्रेसला आलेले यश यामुळे देशाचे नेतृत्व करणाºया नेत्यांना यंदा घरच्या अंगणात उठाबशा काढाव्या लागल्या. तीन-चार दशकांपासून राजकारण करणाºया मोदी-शहा यांना राहुल गांधींसह हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुणांनी जेरीस आणले. सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी, भाजपाची दमछाक करण्यात काँग्रेसला यश आले.टीका करून भाजपाने विरोधकांचे महत्त्व वाढवले-तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री बदलूनही विकासाचा मुद्दा चालविण्याऐवजी काँग्रेस व विशेषत: राहुल गांधी विरोधावर प्रचारात भर दिल्याने विरोधकांचेच महत्त्व अधोरेखित झाले.अतिआत्मविश्वास राखणाºया भाजपाला गोध्रा, वाघोडिया, जंबुसर, अकोटा, शहरवाडी, कलोल आदी अनेक ठिकाणची बंडखोरी टाळण्यात आलेले अपयश मतविभागणीला निमंत्रण देणारे ठरले.विकासासोबतच राज्यातील सर्व जाती, समूहांमध्ये व विशेषत: व्यापारी, शेतकरी आदी वर्ग विशेषांमध्ये सत्ताधाºयांना आपल्या प्रतिची विश्वासार्हता निर्माण करता येणे अपेक्षित असते. संपूर्ण राज्यातील व खासकरून सौराष्ट्रातील निकाल पाहता ती विश्वासार्हता कमी झाल्याचे स्पष्ट झाले.राहुल गांधी यांचे सोशल इंजिनीअरिंग-पक्षाचे तरुण नेते राहुल गांधी यंदा स्वत: मोठ्या आत्मविश्वासाने प्रचारात सहभागी होते. शिवाय टिष्ट्वटरवरील प्रश्नमालिकेने त्यांचा ‘होमवर्क’ही पक्का असल्याचे दिसून आले.भाजपाच्या सततच्या सत्तेमुळे राज्यातील ग्रामपातळीपर्यंतचे कॉँग्रेसचे केडर नामशेष झाल्यासारखी स्थिती असली तरी पाटीदार, ओबीसी, दलित, आदिवासी असे सर्व समाज घटकांचे ‘सोशल इंजिनीअरिंग’ घडविण्यात यश आले.विकासाचे नाव घेताना धार्मिक ध्रुवीकरणात काँग्रेसला नेहमी खलनायक दर्शविण्याची भाजपाची आजवरची खेळी काँग्रेसने मंदिरमार्ग अनुसरून उलटविली.
विकास वेडावलाच, विश्वासार्हताही घसरली! भाजपाच्या घसरगुंडीची कारणे
By किरण अग्रवाल | Published: December 19, 2017 1:09 AM