सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी करसुधारणा वस्तू व सेवा कर उर्फ जीएसटीचा प्रारंभ ३0 जूनच्या मध्यरात्री ११ वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घंटानादाने होईल. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ आॅगस्ट १९४७ च्या मध्यरात्री ‘नियतीशी भेटीचा करार’ (ट्रिस्ट वुइथ डेस्टिनी) चा रोमहर्षक उल्लेख करीत, भारत देश स्वतंत्र झाल्याचे ऐतिहासिक भाषण ज्या सेंट्रल हॉलमध्ये केले, त्याच धर्तीवर भारतातील सर्वात मोठी करप्रणाली जीएसटीचा ऐतिहासिक शुभारंभ करण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे. माजी पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहाणारया नव्या करप्रणालीचा शुभारंभ करण्यासाठी अगोदर विज्ञान भवनाची निवड करण्यात आली तथापि, भारतीय व्यवस्थेत जीएसटीचे महत्त्व लक्षात घेता, या कार्यक्रमासाठी संसद भवनातील सेंट्रल हॉलची निवड करण्यात आली. या भव्य कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, आर्थिक उदारीकरणाच्या कालखंडातील भारताच्या नव्या अर्थकारणाचे जनक माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, तसेच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व जीएसटी करप्रणालीला अंतिम आकार देण्यासाठी, ज्या जीएसटी कौन्सिलच्या १७ बैठका झाल्या, त्यात सहभागी झालेले सारे सदस्य व अर्थातच लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपस्थित असतील. या कार्यक्रमात मुख्य भाषण अर्थातच पंतप्रधान मोदींचे असेल, याखेरीज अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असतील, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री असताना वस्तू व सेवा कर संसदेत पहिल्यांदा सादर झाले. आता १ जुलैपासून केरळ व जम्मू काश्मीर या दोन राज्यांना वगळून, साऱ्या देशभर जीएसटीची अंमलबजावणी सुरू होते आहे. पुढील आठवड्यात केरळ विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर होईल, तसेच जम्मू काश्मीरचीही त्या दिशेने तयारी सुरू आहे.
३0 जूनला मध्यरात्री जीएसटीचा घंटानाद
By admin | Published: June 21, 2017 3:20 AM