नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाई मोठ्या प्रमणात वाढत आहे. दरम्यान, महागाईने होरपळलेल्या जनतेला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार पुढील महिन्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये सरकार जीएसटीच्या दरांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सुमारे १४३ वस्तूंवरील जीएसटीच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याबाबत सरकारने राज्यांकडून अभिप्राय आणि सूचना मागवल्या आहेत. या वाढीमुळे केंद्राच्या महसूलामध्ये वाढ होईल. तसेच राज्य सरकारांना नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही.
सरकार या १४३ वस्तूंपैकी ९२ वस्तूंना १८ टक्के स्लॅबमधून हटवून २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ही प्रस्तावित वाढ ही केंद्र सरकारने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि २०१७ आणि २०१८ मध्ये केलेल्या कपातीला संपुष्टात आणेल.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या वस्तूंवरील जीएसटीच्या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे त्यामध्ये पापड, गुळ, पॉवर बँक, घड्याळे, सुटकेस, हँडबॅग, परफ्युम, कलर टीव्ही सेट (३२ इंचांपेक्षा कमी), चॉकलेट, च्युइंगम, अक्रोड, कस्टर्ड पावडर, नॉन अल्कोहोलिक बेवरेज, सिरेमिक सिंक वॉश बेसिन, काळे चष्मे, चष्म्यासाठीचे फ्रेम आणि चामड्याचे अपेरल आणि कपड्यांच्या सामानाच समावेश आहे.
पापड आणि गुळासारख्या वस्तूंवरील जीएसटीचा दर हा शुन्यावरून वाढवून ५ टक्के केला जाऊ शकतो. चामड्याचे अपेरल आणि सहाय्यक उपकरणे, मनगटी घड्याळ, रेझर, परफ्युम, प्री-शेव, आफ्टर शेव्हची तयारी, डेंटल फ्लॉस, चॉकलेट, कोको पावडर, नॉन अल्कोहोलिक बेवरेज, प्लायउड, विजेची उपकरणे आदी तयार करण्याच्या वस्तूंवरील जीएसटी हा १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित आहे.