नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) महसुलातील तूट काही प्रमाणात केंद्राने निधी दिल्यामुळे आणि काही प्रमाणात कर्ज घेतल्यामुळे भरून निघाली आहे. मात्र, ही तूट २.४६ अब्ज रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. यापैकी केंद्राने एप्रिल आणि मे या कालावधीसाठी ४० हजार काेटी रुपये जीएसटी अधिभाराच्या संकलनातून दिले आहेत. तर, ८४ हजार काेटी रुपये विशेष कर्जाद्वारे पुरवल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. कोराेनाच्या काळात राज्य सरकारच्या जीएसटी संकलनामध्ये माेठी तूट निर्माण झाली आहे. हा आकडा २.३५ अब्ज रुपयांपर्यंत राहण्याचा अंदाज हाेता. मात्र, प्रत्यक्ष तूट वाढली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी केलेली तरतूद पुरेशी नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी केंद्र सरकार १.१ अब्ज रुपये उभारणार असून ते राज्यांना देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राची एप्रिल आणि नाेव्हेंबर या कालावधीतील जीएसटी थकबाकी सर्वाधिक ३१ हजार ८९२ काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. तर गुजरातची थकबाकी १७ हजार काेटी, कर्नाटकची १९ हजार ५०० काेटी असून त्याखालाेखाल तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशची १५ हजार काेटी रुपये आहे.
जीएसटी संकलन तूट २ अब्ज; केंद्राकडे महाराष्ट्राची सर्वाधिक जीएसटी थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:50 AM