जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी आहे. भारताचे सकल वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलन जून महिन्यात १,६१,४९७ कोटी रुपये होते, जे वार्षिक आधारावर १२ टक्क्यांनी वाढ दर्शवते. मागील महिन्यात, मे २०२३ मध्ये, हा आकडा १,५७,०९० कोटी रुपये होता. म्हणजेच गेल्या महिन्याच्या तुलनेत ४,४०७ कोटी रुपये अधिक आहे. जीएसटी लागू झाल्यापासून ही सलग चौथी वेळ आहे, तर एकूण जीएसटी संकलन १.६ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
राणी दुर्गावतींची ५०० वी जयंती देशभरात, चित्रपटही काढणार; PM मोदींची घोषणा
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर या वर्षी एप्रिल २०२३ मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन झाले. हा आकडा १.८७ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे, जर आपण मासिक जीएसटी महसुलाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर सलग १६ महिने ते १.४ लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे. याआधी, सर्व अहवालांमध्ये, जूनचे संकलन मेच्या तुलनेत जास्त असेल आणि १.६ लाख कोटींच्या पुढे जाईल, अशी अपेक्षा होती.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात सरासरी मासिक GST संकलन १.१० लाख कोटी रुपये होते, तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ते १.५१ लाख कोटी रुपये होते आणि २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत सरासरी संकलन १.६९ लाख कोटी रुपये होते. जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सरकारने सादर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जून २०२३ मधील एकूण GST संकलनापैकी केंद्रीय GST (CGST) मध्ये ३१,०१३ कोटी रुपये आणि राज्य GST (SGST) ३८,२९२ कोटी रुपयांचा समावेश आहे.
१ जुलै २०१७ रोजी जुन्या अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या जागी वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा मानली जाते. केंद्र सरकारच्या माहिती दिल्यानुसार ६ वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे देशातील जनतेवरील कराचा बोजा कमी होण्यास मदत झाली आहे.