नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) केंद्र सरकार टॅक्स स्लॅब 14 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्र सरकार 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत असताना दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार सरकार करत आहे. नवी दिल्ली होणाऱ्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जीएसटी फिटमेंट कमिटीचे प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी सांगितल्यानुसार, जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब एकत्र करण्यावर काम सुरू आहे.
(जीएसटीची सर्वाधिक चोरी महाराष्ट्रात, मुंबई अव्वल)
यासंदर्भात राज्यांसोबतही चर्चा केली जात आहे. यामध्ये एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो. जीएसटी काऊंसिलची होणारी ही बैठक पूर्णपणे छोट्या उद्योगांवर केंद्रीत असणार आहे.
दरम्यान, जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परिषद सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा विदर्भ चेंबर्स आॅफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, चेंबर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन खंडेलवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव विवेक डालमिया, राहुल गोयनका, किशोर बाछुका यांनी व्यक्त केली आहे.