ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- मारूती कार घेण्याचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींचं कार घ्यायचं स्वप्न आता साकार होइल, असं म्हणायला काही हरकत. तसंच आता मारूती कार घ्यायला गेलात तर तुम्हाला पैसेसुद्धा कमी मोजावे लागतील. कारण शुक्रवारी मध्यरात्री जीएसटी लागू झाल्यावर मारूती कंपनीच्या काही गाड्यांची किंमत 3 टक्क्यांनी कमी झाली आहे. एक देश एक करप्रणाली ही व्यवस्था शनिवारपासून भारतात लागू झाली आहे. त्यामुळे मारूती कारसह इतर कार कंपन्याही नवीन दर घेऊऩ बाजारात येत आहे. पण सध्या मारूती कारच्या किंमती 3 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मारूती सुझुकीच्या काही निवडक गाड्यांवर ३ टक्के कपात करण्यात आली आहे.आता मात्र काही हायब्रिड कारच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही.
#Maruti cuts prices of select vehicles by up to 3 per cent to pass on #GST benefit to customers.— Press Trust of India (@PTI_News) July 1, 2017
जीएसटीमुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर काही वस्तू महागही होणार आहेत. तसंच विविध प्रकारच्या करांमधून लोकांची सुटका झाली असून GST अर्थात वस्तू आणि सेवा कर हा एकच कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमतींमध्ये बदल झाले आहेत. मारूती कारच्या काही मॉडेल्सची किंमत तीन टक्क्यांनी स्वस्त होणं, हा याच करप्रणालीचा एक भाग आहे.
फक्त मारूती कारच नाही तर टू व्हीलरही स्वस्त झाल्या आहेत, तसंच येणाऱ्या काळातही त्या स्वस्त होणार आहेत. ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या गाड्यांच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही. मारूती गाड्यांची किंमत 3 टक्क्यांनी घटल्यामुळे 5 लाखाची गाडी 15 हजार रूपयांनी स्वस्त होणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गाड्यांची किंमत घटणार असं शुक्रवारी सांगितलं होतं पण नेमक्या किती किंमती घटणार हे मात्र निश्चित नाही. त्यावर अजून काम सुरू आहे. विविध राज्यात वेगवेगळा कर आहे त्यामुळे शेवटची टक्केवारी काढली जाते आहे, असं मारूती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शनिवारी रात्रीपर्यंत नव्या किंमती जाहीर होतील, अशीही माहिती समोर येते आहे.