लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पापडावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागणार नाही, असा निर्णय ‘अग्रीम निवाडा प्राधिकरणा’च्या (एएआर) गुजरात खंडपीठाने दिला. पापडाशी संबंधित इतर तळलेल्या प्रकारांवर १८ टक्के जीएसटी लागेल, असा निर्णय याआधी एएआर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेला आहे.
गमतीशीर निरीक्षण नोंदवित गुजरात ‘एएआर’ने म्हटले की, पापड हे हाताने बनविले जातात. गोलाकार लाटणे सोपे जाते, म्हणून ते परंपरेने त्याच आकारात बनविले जातात. पण, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पापडांना वेगवेगळ्या आकारात आणले आहे. असे असले तरी जोपर्यंत उत्पादनातील घटक आणि प्रक्रिया याबाबतीत समानता आहे, तोपर्यंत पापड ‘एचएसएन १९०५९०४०’ या श्रेणीतच राहतील आणि या श्रेणीत जीएसटी दर शून्य आहे.
ग्लोबल गृह उद्योग या संस्थेने पापडाची श्रेणी निश्चित करण्यासाठी एक याचिका एएआर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने हा निर्णय दिला. याचिकेत म्हटले होते की, पापड हा शिजविलेला पदार्थ नाही. ते ‘इन्स्टंट फूड’ही नाही. कारण खाण्याआधी त्याला तळणे किंवा भाजणे आवश्यक असते. याचिकाकर्त्यांचे हे म्हणणे खंडपीठाने मान्य केले.
प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यतासोनल प्रॉडक्ट्सच्या एका खटल्यात गुजरात एएआरने पापडाच्या तळलेल्या इतर प्रकारांवर १८ टक्के जीएसटी लागेल, असा निर्णय यापूर्वी दिलेला आहे. यासंदर्भात एका सनदी लेखापालांनी सांगितले की, काही उच्च न्यायालयांनी पापडाच्या तळलेल्या प्रकारांना (फ्रायम) पापडच गृहीत धरण्याचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे एएआरच्या ताज्या निर्णयाचे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाऊ शकते.