चेन्नई : मिठाईवर अत्यंत क्लिष्ट पद्धतीने जीएसटी लावण्यात आल्यामुळे उत्पादक हैराण झाले आहेत. उदा. साध्या बर्फीवर ५ टक्के जीएसटी आहे, चॉकलेट बर्फीवर मात्र, तो २८ टक्के आहे. साध्या बर्फीवर वेलची आणि सुक्या मेव्याची सजावट केल्यास १२ टक्के कर लागेल. या करपद्धतीमुळे मिठाई उत्पादक गोंधळून गेल्याचे चित्र आहे.सूत्रांनी सांगितले की, मिठाईमध्ये कोणते पदार्थ आहेत, यावरून कर ठरतो. मोठा कर दर असलेला एखादा पदार्थ नुसता चवीपुरता जरी टाकला असेल, तरी मिठाईवरील कर वाढतो. विचित्र पद्धतीने लावण्यात आलेल्या जीएसटीचा सर्वाधिक फटका अनेक पदार्थ टाकून बनविलेल्या मिठायांना बसला आहे. आइसक्रीम, फळे, जेली, जॅम, चॉकलेट इत्यादींचा समावेश असलेला फालुदा २८ टक्के कराच्या कक्षेत येतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सोर्बिटॉलसारखे स्विटनिंग एजंट असलेल्या मिठाया १८ टक्के कराच्या कक्षेत येतात. या गुंतागुंतीच्या कर रचनेतून सुटण्यासाठी मिठाई उत्पादकांनी मिठायांचे प्रकार कमी केले आहेत.के. सी. दास या मिठाई शृंखलेचे संचालक महेश राजशेखर यांनी सांगितले की, आम्ही गुंतागुंतीच्या मिठाया बनविणे बंद केले आहे. आम्ही आता साधा सांदेश, साधा बादुशा, साधी बर्फी आणि साधा पेढा बनवित आहोत. आंबा आणि चॉकलेटयुक्त सांदेश बनविणे आम्ही सध्या बंद केले आहे. यात ५ टक्क्यांपेक्षा जास्त कोका घटक असल्यामुळे हे पदार्थ २८ टक्के कराच्या कक्षेत येतील का, हे आम्ही सध्या पडताळून पाहत आहोत. बदाम मिल्क, बासुंदी आणि रसमलाई हे पदार्थ मिठाईत (५ टक्के कर) येतात की शीतपेयात (१२ टक्के कर), याबाबत आम्हालाच अजून खात्री नाही.अप्रत्यक्ष कर सल्लागार संस्था ‘एर्न्स्ट अँड यंग’चे भागीदार सुरेश नायर यांनी सांगितले की, शेंगदाणे आणि गूळ समसमान प्रमाणात घालून बनविलेली चिक्की कोणत्या करश्रेणीत घालायची, याबाबत मतभेद आहेत. शेंगदाणे, काजू १८ टक्के कराच्या कक्षेत, गूळ ५ टक्के कराच्या कक्षेत येतो. नमकीन, आलू भुजिया, मिक्श्चर अशा उत्पादनांतही काजू, शेंगदाणे घातल्यास, कर १८ टक्के होतो. त्यामुळे आता अनेक उत्पादक अन्य पर्यायी पदार्थ घालून आपली उत्पादने १२ टक्के कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
क्लिष्ट जीएसटीमुळे मिठाई उत्पादक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:04 AM