सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे ऐतिहासिक लाँचिंग ३0 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमधे होणार आहे. या सोहळयाची रंगीत तालिम बुधवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमधे संपन्न झाली. तथापि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाने जीएसटीला विरोध करण्यासाठी ३0 जूनच्या सोहळयावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षप्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी पत्रकारांना सांगीतले. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी सरकारने पूर्ण केली आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अॅण्ड कस्टम्सच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात ही करप्रणाली लागू करण्याआधी जीएसटीशी संबंधित साऱ्या अडचणी दूर करणे व त्वरित फिडबॅक मिळवणे यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी एक रिसोर्स सेंटर (अॅक्शन वॉर रूम) तयार करण्यात आले आहे. ही अॅक्शन वॉर रूम सिंगल विंडोच्या धर्तीवर सकाळी ८ ते रात्री १0 वाजेपर्यंत काम करणार आहे. अनेक फोन लाईन्ससह कम्प्युटरची अद्ययावत यंत्रणा त्यासाठी तैनात करण्यात आली आहे. वॉर रूममधील उपस्थित अधिकारी, तज्ज्ञांच्या मदतीने जीएसटीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतील. स्वातंत्र्यानंतर प्रथमच १६ कर समाप्त करून जीएसटी अस्तित्वात येत आहे. जम्मू-काश्मीर वगळता तमाम राज्यांच्या विधानसभांमधे हा कायदा मंजूर झाला आहे. नव्या प्रणालीत करांचे दर आणि अनेक वस्तंूच्या किमती खाली येणार आहेत.
जीएसटी लाँचिंगची संसदेत रंगीत तालीम
By admin | Published: June 29, 2017 12:30 AM