ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8- भाजप सरकारचं बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत सर्वपक्षीयांचे आभार मानले आहेत. जीएसटी मंजूर झाल्यानं टॅक्स टेररिझमपासून मुक्ती मिळाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.
जीएसटी मंजूर होणं म्हणजे भारतातल्या लोकशाहीचा विजय झाल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. जीएसटी म्हणजे केवळ करव्यवस्था नसून एक भारत या भावनेला बळ देणारी व्यवस्था आहे. जीएसटी म्हणजे एका पक्षाचा नाही तर हा लोकशाहीचा विजय आहे. दोन्ही सभागृहांनी खूप विचारमंथन करून जीएसटीला इथपर्यंत आणलं आहे आणि लवकरात लवकर ते मंजूर करून कर रचना सुधारण्यास मदत केल्याचं मत यावेळी नरेंद्र मोदींनी मांडलं आहे.
जीएसटीमुळे सर्व प्रकारचे छुपे कर रद्द होतील. टॅक्स क्रेडिटचा प्रवाहही सरळ सोपा राहील. याचा या क्षेत्राला लाभच होईल. जीएसटी १ एप्रिलपासून लागू करण्याचा आपला प्रयत्न आहे. जीएसटी विधेयकाचा ग्राहकांना ख-या अर्थानं फायदा होणार असून, ग्राहक खरा राजा होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा ग्राहकाला होणार आहे. जीएसटीमुळे देशातली अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासही मदत होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.