ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - जीएसटीच्या निमित्तानं आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिली. जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच यातून एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार आहेत, असेही मोदी म्हणाले. जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचं वा, एका नेत्याचं नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचं यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले. 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक झाली, ती याच सेंट्रल हॉलमध्ये, सेंट्रल हॉलची जागा अनेक राष्ट्रपुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे. त्यामुळे देशाला नव्या वाटेनं नेणा-या जीएसटीचा स्वीकार करण्यासाठी यासारखी दुसरी जागा असू शकत नाही, असंही मोदी म्हणाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश एकसंध ठेवण्याचे काम केले. त्यांनी ते एकीकरण केले नसते, तर देश विखुरला असता. आज जीएसटीच्या माध्यमातून आर्थिक एकीकरणाचे काम झाले आहे. राज्यघटनेचा स्वीकार करताना याच सेंट्रल हॉलमध्ये ज्या पद्धतीनं विचारविमर्श झाला, वादांमधून सामोपचारानं मार्ग निघाला, त्याच पद्धतीनं जीएसटी काऊन्सिलनं, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्षांनी सहयोगातून जीएसटीची पारदर्शक व्यवस्था सिद्ध केली आहे. या रूपात देश एका आधुनिक सुलभ आणि पारदर्शक व्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करू शकणार आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना त्यातून आळा घालण्याचे काम होणार आहे. मुख्य म्हणजे यामुळे इन्स्पेक्टर राज संपुष्टात येईल आणि प्रामाणिक व्यापा-यांची जाचातून मुक्तता होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
75 लाखांच्या उलाढालीवर किरकोळ कर लागणार आहे. जीएसटीमुळे गरिबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळणार आहे. कच्चे बिल आणि पक्के बिल यांसारखे प्रकार बंद होणार आहेत. जीएसटी म्हणजे काय आहे याचे साधे-सोपे विवेचन करताना मोदींनी चष्म्याचे उदाहरण दिले. तपासणी करणारा डॉक्टर तोच. चष्मा बनविणाराही जुना- आपल्या विश्वासातला. त्या डॉक्टरनं नव्यानं काढून दिलेल्या बदललेल्या नंबरचा नवा चष्मा आल्यानंतर दोन दिवस नजर अॅडजेस्ट करण्यात जातातच की, या मोदींच्या विधानावर सेंट्रल हॉलमध्ये खसखस पिकली.