GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 12:11 PM2017-11-10T12:11:05+5:302017-11-10T12:14:17+5:30
GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे
नवी दिल्ली - GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे. मीच काय अगदी तज्ज्ञ असलेल्या सीएंना व व्यापाऱ्यांनाही अजून जीएसटी नीट समजलेला नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. जर, तज्ज्ञ मंडळींना जीएसटी समजलेला नसेल तर मला काय समजणार, त्यामुळे मी त्यावर बोलणं उचित होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
अर्थात, काही काळ गेल्यानंतर नवीन कररचना लक्षात येईल अशी मल्लीनाथीही त्यांनी नंतर केली. या वर्षी जुलै महिन्यापासून अनेक कर रद्द करून एकच कर म्हणून जीएसटी लागू करण्यात आला. सोपी करप्रणाली असं वर्णन करण्यात आलेला जीएसटी प्रत्यक्षात मात्र क्लिष्ट व व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी असल्याची टीका सगळ्या थरांतून होत आहे.
जीएसटीची रचना चांगली नसून तो अत्यंत घाई घाईत लागू करण्यात आला अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची टीकाही गांधी यांनी केली आहे.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या सभेमध्ये गांधी यांनी जीएसटीवरही सडकून टीका केली. सरकारी अडथळे असलेला, क्लिष्ट असा जीएसटी असून त्यामुळे सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप गांधींनी केला आहे. आधुनिक जगातील हे लायसन्स राज असून सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात नको इतकी सत्ता जीएसटीमुळे गेल्याचा दावाही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजपाच्याच आमदाराने जीएसटी क्लिष्ट असल्याचे व तज्ज्ञांनाही समजत नसल्याचे विधान केल्यामुळे हा भाजपा सरकारला घरचा आहेर असल्याचे मानण्यात येत आहे.