ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासून लागू होतो आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही गोष्टींसाठी महागाईचा सामनाही करावा लागणार आहे. शनिवारी सकाळपासून कोणतीही वस्तू खरेदी केल्यास नव्या करप्रणालीनुसार आपल्याला कर द्यावा लागेल. जीएसटीचा तुमच्या लव्ह लाइफवरसुद्धा तितकाच परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे जीएसटीमुळे आपल्या जोडीदाराबरोबर डेटवर जाताना काही गोष्टी स्वस्त होतील तर काही महाग होणार आहेत.
जाणून घ्या जीएसटीचा डेटिंगवरील परिणाम:
डिनर डेट
प्रेमी युगुल डेटसाठी नेहमीच बाहेर जेवायला जाणं पसंत करतात. तुम्ही जर पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवणावर 28 टक्क्यांच्याऐवजी 18 टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बिलाचं टेंशन असणाऱ्यांना मोदी सरकारने थोडासा दिलासा दिला आहे. तसंच कुठल्याही बिगर वातानुकुलित हॉटेलमध्ये गेल्यास बिलावर 12 टक्के कर भरावा लागणार आहे. एकंदरीतच जीएसटीनंतर डिनर डेट काही प्रमाणात स्वस्त होइल.
मुव्ही डेट
जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जुन्या सिनेमागृहात सिनेमा पाहायल आवडत असेल तर तुम्हाला दिलासा मिळणार आहे. जुन्या सिनेमागृहात 100 रूपयांच्या तिकिटावरील 28 टक्के कर रद्द करून तो कर 18 टक्के करण्यात आला आहे. पण मल्टीप्लेक्समध्ये 28 टक्के इतका कर द्यावा लागणार आहे. प्रत्येक राज्यात मनोरंजन कर शून्यापासून ते 110 टक्के इतका घेतला जातो.
गेटअवे डेट
परदेशात डेटसाठी जाणंसुद्धा जीएसटीमुळे सोयीस्कर होणार आहे. परदेशात एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी डेटसाठी जायचं झाल्यास, विमानाच्या इकॉनमी क्लासच्या प्रवासासाठी 6 टक्क्यांच्याऐवजी 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. पण बिझनेस क्लासमधून प्रवास केल्यास 9 टक्क्यांऐवजी 12 टक्के कर भरावा लागेल. तसंच हॉटेलमध्ये रूम बुकिंगवर 18 टक्के जीएसटी असेल. जीएसटीच्या आधी 21.3 टक्के कर होता. 1 जुलैपासून 1 हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या रूमवर कुठलाही कर नसेल. त्याचबरोबर 1000 ते 2500 रूपये भाडं असणाऱ्या रूमवर 12 टक्के आणि 2500 ते 7500 रूपयांपर्यंत भाडं असणाऱ्या हॉटेल रूम बुकिंगवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे.
प्रायव्हेट गाडीतून प्रवास
जीएसटी लागू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या साथीदारासह आरामात प्रायव्हेट कॅबमधून फिरू शकणार आहात. ओला आणि उबेरच्या प्रायव्हेट कॅब पुरविणाऱ्या कंपन्यांना 6 टक्क्यांऐवजी 5 टक्के कर द्यावा लागेल. यामुळे कॅबसाठी होणाऱ्या खर्चात बचल होइल, असं बोललं जातं आहे.
डेटच्या तयारीसाठी होणारा खर्च
डेटवर जाण्यासाठी मुलीला तयार होण्यासाठी होणाऱ्या खर्चात फार बदल होणार नाही. कॉस्मेटीक प्रॉडक्टवरील कर जीएसटीनंतर वाढून 28 टक्के होणार आहे. 500 रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या चपलांवर 5 टक्के कर असेल, आता हा कर 9.5 टक्के आहे. तसंच 500 रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या चपलांवर 18 टक्के कर लागेल.