ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाल्यास सामान्य माणसाच्या खिशावर बोजा वाढणार आहे. कारण अनेक जिवनावश्यक वस्तूंचे भाव त्यामुळे वाढणार आहेत. आज केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये जीएसटी दर निश्चित करण्यासाठी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. मात्र, यापुर्वी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील करांची मर्यादा किमान 6 टक्क्यांपासून कमाल 26 टक्के इतकी ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी जर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले तर तर भविष्यात चहा, कॉफी, खाद्यतेल,डाळी, चिकन आदी गोष्टींवरील करांमध्ये वाढ होणार आहे. कारण सध्या या वस्तूवर केवळ 3 ते 5 टक्के कर लावला जातो. नव्या कर प्रणालीत किमान 6 टक्के इतक्या कराची तरतूद आहे. गॅस स्टोव्ह, गॅस बर्नर, मॉस्किटो रिपेलेंट आणि कीटनाशक या वस्तूही महाग होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे टिव्ही , एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशिन, इन्व्हर्टर या वस्तू स्वस्तही होऊ शकतात. कारण या वस्तूंवर सध्या 29 टक्के इतक्या दराने कर आकारला जातो. तो नंतर 26 टक्के इतका होणार आहे.