ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - मुस्लिम महिलांना सेक्सबाबत धडे देणारं एक पुस्तक मुस्लिम महिलेनेच लिहिलं आहे. ‘दि मुस्लिमाह् सेक्स मॅन्युअल – हलाल गाइड टू माइंड ब्लोइंग सेक्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे. मुस्लिम महिलांना सेक्सबाबत धडे देणारं हे पहिलंच पुस्तक असण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हे पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तक लिहिणा-या महिलेने स्वतःची ओळख उघड केली नसली तरी उम मुलाधत या काल्पनिक नावाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यापासून इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. सेक्स लाइफचा आनंद अधिक चांगल्याप्रकारे कसा घ्यायचा? मुस्लिम महिलांनी वैवाहिक जीवनात सेक्सची योग्यप्रकारे मजा कशी घ्यावी? याबाबतची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. या पुस्तकात अनैतिक संबंधांबाबत नव्हे तर पतीसोबत संभोग करताना पुढाकार घेण्याच्या मुद्द्याला अधोरेखीत करण्यात आलं असल्याचं लेखिकेने स्पष्टिकरण दिलं आहे. मात्र विषय वादग्रस्त असल्याने पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे.
ब्रिटीश वृत्तपत्र गार्डियनसोबत बोलताना लेखिका उम मुलाधत म्हणाली, "" या पुस्तकामुळे माझं कौतूक करणारे, पाठीवार शाबासकीची थाप देणारे संदेश मला मिळत आहेत. मात्र, काहीजण माझ्यावर अत्यंत वाईट शब्दांमध्ये टीका करत आहेत. असं पुस्तक लिहिण्याची आवश्यकता नव्हती कारण माझ्या आईकडून मी सर्वकाही शिकले आहे असं एका महिलेने मला म्हटलं. पण त्या महिलेची आईने स्वतः या विषयावर कधी मनमोकळेपणे चर्चा केली असेल याबाबत माझ्या मनात शंका आहे"" असं लेखिका म्हणाली.
सेक्स सारख्या महत्वाच्या विषयाबाबत महिलांना खूप कमी माहिती असते. काहीही माहिती नसताना त्या लग्नबंधनात अडकतात. या विषयावर भाष्य करणारे कमी पुस्तकं उपलब्ध आहेत, शिवाय जे पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामध्ये बहुतांश माहिती काहीही उपयोगाची नसते त्यामुळेच अशाप्रकारचं पुस्तक लिहिण्याचा विचार मनात आल्याचं लेखिका उम मुलाधत यांनी सांगितलं.