नवी दिल्ली : नितीश कटारा हत्याकांडातील तीन दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारी दिल्ली सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. तिन्ही दोषींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत नाही. त्यामुळे दोषींना फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणातील तीन दोषींमध्ये विकास आणि विशाल यादव या दोन चुलत भावांचा समावेश आहे.विकास, विशाल आणि अन्य एक दोषी सुखदेव पहेलवान यांना फाशी देण्याची मागणी दिल्ली सरकारने केली होती. तथापि न्या. जे. एस. खेहर आणि न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी नितीशची आई नीलम कटारा यांनीही दोषींना फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.नितीशचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी विकास, विशाल व सुखदेव हे तिघे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सत्र न्यायालयाने २००८ मध्ये त्यांना ही शिक्षा सुनावली होती. यानंतर उच्च न्यायालयाने यादव बंधूंना ३० आणि सुखदेवला २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला दोषींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. काय आहे प्रकरण?नितीशचे यादव बंधूंच्या बहिणीवर प्रेम होते. या प्रेमास घरच्यांचा विरोध होता. त्यातूनच १६ फेबु्रवारी २००२ रोजी नितीशचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती.
कटारा हत्याकांडातील दोषींना फाशी नाहीच
By admin | Published: November 17, 2015 2:45 AM