बापरे! काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवणं पडलं महागात, तब्बल 1200 जण आजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:33 PM2022-03-05T20:33:37+5:302022-03-05T20:39:26+5:30
लग्न समारंभात जेवण झाल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
नवी दिल्ली - गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, विसनगर ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा विसनगर तालुक्यातील सावला गावात घडली आहे.
मेहसाणा पोलीस अधीक्षक पार्थराज सिंग गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात जेवण झाल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पोलीस अधीक्षकांनी जेवण झाल्यानंतर लोकांना उलटी आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर विसनगर, मेहसाणा आणि वडनगरमधील विविध रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे.
अधिकाऱ्यांनी लग्न समारंभात दिलेल्या जेवणाचे नमुने फॉरेन्सिक आणि अन्न व औषध प्रशासनाकडून तपासासाठी एकत्र करण्यात आले आहेत असं सांगितलं. विसनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावला गावात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.